सम्यक जिंतूरकर, साक्षी चव्हाण अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:01 AM2018-06-05T01:01:02+5:302018-06-05T01:01:02+5:30
सम्यक जिंतूरकर, साक्षी चव्हाण अव्वल
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अत्यंत महत्वाची असलेल्या नीट परीक्षेचाचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठी भरारी घेतली आहे. येथील सम्यक जिंतूरकर याने अखिल भारतीय पातळीवर ३११ तर, अंबड येथील साक्षी चव्हाण या विद्यार्थिनीने ३५१ रँक मिळवून मोठे यश संपादन केले आहे.
सोमवारी जाहीर झालेल्या निकालात दिपाली संदीप मुथा, अपेक्षा टंडन, पार्थ देशमुख, काजोल अग्रवाल, घनसावंगी येथील जयश्री यादव, कोमल पोधाडे, राजू राठोड, यांनी घवघवीत यश मिळविले आहे. या सर्वांना आता एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळणार असून, त्यांची डॉक्टर बनण्याची इच्छा यातून पूर्ण होणार आहे. नीट परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीला फाटा दिला. अभ्यासावर लक्ष केंद्रित करून या खडतर अशा परीक्षेत रँक मिळविण्यासाठी जिवाचे रान केले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय हे शिक्षकांना दिले आहे. त्यात पार्थ देशमुख याने सांगितले की, मला हे जे यश मिळाले त्यात प्रा. एस.के. पंडित, प्रा. एम.एम. शिंदे आणि प्रा. आर.पी. सोनवणे यांचा सहभाग आहे.
न्यूरोसर्जन व्हायचेय
सम्यक अतुल जिंतूरकर याला त्याच्या घरातून वैद्यकीय अभ्यासाचे बाळकडू मिळाले आहे. आई, वडील डॉक्टर असून, अतुल जिंतूकर हे येथील आॅर्थोपेडीक आहेत. सम्यकचे प्राथमिक शिक्षण येथील गोल्डन ज्युबिली हायस्कूलमध्ये झाले आहे. भविष्यात न्यूरोसर्जन होण्याचे त्याचे ध्येय असून, वैद्यकीय सेवेसोबतच सम्यकला मोटीवेशनल स्पीकर व्हायचे आहे. शालेय स्तरापासूनच वेगवेगळ्या वाद-विवाद स्पर्धेत त्याने सहभाग नोंदवून राज्य पातळीवर मजल मारली आहे. अपेक्षित रँक मिळाली नसली तरी, मुंबईतील केईएम वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस करून नंतर, न्यूरोसर्जन करणार असल्याचे सम्यकने सांगितले.
साक्षीला रेडिओलॉजीमध्ये करायचे करिअर
अंबड येथील डॉ. चव्हाण यांची मुलगी साक्षी चव्हाणने नीट परीक्षेत अखिल भारतीय पातळीवर ३५१ वी रँक मिळविली आहे. तिला मुंबईतच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचे असून, भविष्यात रेडिओलॉजी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असल्याचे तीने सांगितले. तिचे प्राथमिक शिक्षण पोद्दार इंग्रजी शाळेत झाले. नीटची तयारी औरंगाबादेत पूर्ण केली.
सैनिकांची सेवा करणार
देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या सेवेसाठी आपल्याला डॉक्टर व्हायचे आहे. ही इच्छा ११ वीत असताना झाली, त्या दृष्टीने अभ्यास केला. या परीक्षेत अपेक्षित रँक मिळाली नसली तरी, एमबीबीएसला प्रवेश मिळण्यास अडचण येणार नसल्याचे पार्थ देशमुखने लोकमतशी बोलताना सांगितले.