लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द कारवाईस गेलेल्या पथकावर वाळूतस्करांनीदगडफेक केली. तसेच कारवाईसाठी येणा-या कर्मचाऱ्यांना वाळूतच पुरण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी दुपारी तालुक्यातील गोरी- गंधारी नदीपात्रात घडली असून, याप्रकरणी १५ वाळू तस्करांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोरी-गंधारी, डोमलगाल, साष्टपिंपळगाव (ता.अंबड) हद्दीतील गोदापात्रातून गेवराई तालुक्यातील अवैधवाळू तस्कर अवैधवाळू उत्खनन व वाहतूक करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीनंतर तहसीलदार राजीव शिंदे, मंडळाधिकारी प्रवीण रुईकर, दिवाकर जोगलादेवीकर, तलाठी संतोष जैस्वाल, रमेश कोणेरवार, रामकिसन महाळे, किरण जाधव, योगेश कुरेवाड आदींच्या पथकाने जीपमधून (क्र. एम. एच. २१- बी.एफ. २९६८) गोरी- गंधारी शिवारातील गोदापात्रात कारवाई केली. त्यावेळी तीन विनानंबरचे नवीन टॅक्टर अवैधवाळू उत्खनन व वाहतूक करताना आढळून आले. दरम्यान पथकातील कर्मचा-यांनी ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला असता दोन टॅक्टर पळून गेले. तर पथकातील कर्मचारींनी एक टॅक्टर पकडला. त्यावेळी चालक-मालक कृष्णा बेंद्रे (रा.गेवराई), बाळू यादव (रा.बेलगाव), नारायण भुसारे (रा.खामगाव), भैय्या जर्हाड (रा.नागझरी), संतोष गवळी (बेलगाव, रा. सर्व गेवराई) व अज्ञात दहा जणांनी तहसीलदाराच्या पथकावर दगडफेक केली. तसेच कर्मचारींशी हुज्जत घालून शिवीगाळ करीत अधिकारींना नदीतच पुरण्याची धमकी देत पथकाच्या ताब्यातील टॅक्टर पळवून नेल्याची तक्रार शहागड सज्जाचे तलाठी अभिजीत देशमुख यांनी दिली. या तक्रारीवरून चालक- मालक कृष्णा बेंद्रे (रा.गेवराई), बाळू यादव (रा.बेलगाव), नारायण भुसारे (रा.खामगाव), भैय्या जर्हाड (रा.नागझरी), संतोष गवळी (बेलगाव, रा. सर्व गेवराई) एकूण पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवैध वाळू वाहतूक; तीन ट्रॅक्टर ताब्याततळणी : मंठा पोलिसांनी सारसती ओढ्यातून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणा-या तिघांविरूध्द सोमवारी रात्री कारवाई केली. यावेळी तीन ट्रॅक्टरसह १२ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.उस्वद- देवठाणा येथील सारसती ओढ्यातून अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. मिळालेल्या माहितीवरून मंठा पोलीस ठाण्यांतर्गत तळणी पोलीस चौकीचे पोकॉ दीपक आढे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सोमवारी रात्री सारसती ओढ्यात कारवाई केली. यावेळी तीन ब्रास वाळूसह तीन ट्रॅक्टर असा १२ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नवनाथ आश्रुबा कोकाटे, नंदकिशोर फकिरा तनपूरे, ज्ञानेश्वर सदाशिव गायकवाड (सर्व रा. टिटवी ता. लोणार जि. बुलढाणा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला.
वाळूतस्करांनी केली पथकावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:25 AM