सिमेंटच्या रस्त्यासाठी चक्क वाळूची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:35 AM2019-02-10T00:35:37+5:302019-02-10T00:36:37+5:30
पूर्णा नदीपात्रातून वाळूची चोरी होत आहे. या वाळूचा वापर चक्क टाकळखोपा व वाघाळा येथील गावाअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : पूर्णा नदीपात्रातून वाळूचीचोरी होत आहे. या वाळूचा वापर चक्क टाकळखोपा व वाघाळा येथील गावाअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. पण या वाळू चोरीला नेमके अभय आहे तरी कोणाचे, असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
वाघाळा व टाकळखोपा येथे २५१५ अंतर्गत ९ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे उद्घाटन राहुल लोणीकर यांच्या हस्ते १८ जानेवारीला करण्यात आले आहे.
मात्र, या रस्त्यासाठी कंत्राटदाराकडून चक्क चोरीची वाळू वापरली जात असल्याचा संशय आहे.
आजपर्यंत कोणत्याच वाळूपट्ट्याचे लिलाव झालेले नसून विकास कामांसाठी हे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत.
स्थानिक वाहनधारकांनी दुधा, टाकळखोपा व वाघाळा या गावाच्या हद्दीतून तब्बल एक हजारांहून अधिक वाळू ब्रासची चोरी केल्याचे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दाखवून दिले आहे. पण, अजून देखील या वाळू चोरीचा साधा पंचनामा देखील झाला नसल्याचे दिसून आले.