वाढीव मदत मिळाल्यासच समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:33 AM2019-11-25T00:33:47+5:302019-11-25T00:34:04+5:30
तुम्ही आता तरी वाढीव मदत द्या, अशी आर्त हाक कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी रविवारी नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला घातली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : कापसाच्या काड्या झाल्या, सोयाबीन गेले, मका गेला, हातात काहीच आलं नाही. शासनाने तोकडी मदत दिली. साहेब अडचणींचा डोंगर आहे. तुम्ही आता तरी वाढीव मदत द्या, अशी आर्त हाक कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी रविवारी नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला घातली.
तालुक्यातील कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील मका, सोयाबीन, कापूस, बाजरी आदी विविध पिकांची पाहणी केली व शेतक-यांसमवेत संवाद साधला़ यावेळी या पथकाने गट नं २० मधील रामेश्वर बळीराम लहाने यांच्या शेतात मका पिकाची पाहणी केली. मक्याला अतिवृष्टीमुळे कोंब फुटले, पीक सडले. पिकासाठी एक लाखाचे पीककर्ज काढून खर्च केल्याचे संबंधित शेतक-याने सांगितले. येथील गट नं. १९ मधील धोंडीबा पांडुरंग जाधव यांच्या शेतातील कापूस, बाजरी या पिकांची पाहणी केली़ यावेळी या अतिवृष्टीमुळे कापसाच्या कवड्या झाल्या असून, या कापसाची वेचणीही करता येत नाही. बाजरीसुध्दा खराब झाल्याने हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतक-यांनी सांगितले़ यावेळी संगीता रमेश कान्हेरे या शेतकरी महिलेने अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनचे पीक नष्ट झाल्याचे सांगत शासनाने दिलेली ८ हजार रूपये हेक्टर म्हणजे सुमारे ३ हजार रू प्रती एकर ही मदत कमी आहे. यात आम्ही केलेला खर्चही निघत नाही. आमचे कर्जही तसेच असून, आम्हाला भरीव मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उपस्थित अनेकांनी शेतक-यांच्या विविध समस्या यावेळी मांडल्या.
या पथकात डॉ व्ही. थिरूपाज, डॉ. के. मनोहरण यांच्यासह जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, तहसिलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के आदींची उपस्थिती होती.