जालना जिल्ह्यातील शाळा वनराईने नटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:48 AM2019-11-24T00:48:32+5:302019-11-24T00:49:21+5:30
जिल्ह्यातील ५८ शाळा वनराईने नटणार आहेत. याला प्रशासनाने ‘डेस फॉरेस्ट’ असे नाव दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात झाडांचे प्रमाण वाढावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी जि.प.च्या ११५ शाळांमध्ये ‘माझी शाळा माझी रोपवाटिका’ ही योजना राबविली. आता ही रोपे मोठी झाली असून, जिल्ह्यातील ५८ शाळा वनराईने नटणार आहेत. याला प्रशासनाने ‘डेस फॉरेस्ट’ असे नाव दिले आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस झाडांचे प्रमाणही कमी होत आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे. त्यामुळे सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना समोरे जावे लागत आहे. वृक्षलागवडीसाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, वृक्ष लागवडीनंतर याकडे लक्ष न दिल्याने ही रोपे जळून जात आहेत. यामुळे हे प्रयत्नही असफल होताना दिसत आहेत.
जिल्ह्यात झाडांचे प्रमाण वाढावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ११५ शाळांमध्ये ‘माझी शाळा माझी रोपवाटिका’ हा उपक्रम राबविण्यात आला. रोपवाटिकेमध्ये रोपे लावण्यात आली. विद्यार्थ्यांनी या रोपवाटिकांचा सांभाळ केला असून, या रोपवाटिकेतील रोपे मोठी झाली आहेत. आता जि.प. प्रशासनाच्या वतीने जि. प. च्या ५८ शाळांमध्ये डेस फॉरेस्ट उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले असून, हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. ११५ शाळांमध्ये तयार केली २ लाख ३० हजार रोपे माझी शाळा माझी रोपवाटिका या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ११५ शाळांमधून तब्बल २ लाख ३० हजार रोपे तयार केली आहेत. या रोपांची लवकरच लागवड करण्यात येणार आहे.