जालन्यात सोमवारपासून शाळा सकाळच्या सत्रात; नव्या वेळापत्रकामुळे शिक्षकांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:51 PM2019-03-07T18:51:50+5:302019-03-07T18:52:10+5:30
एक तास उशीराने शाळा सुटणार असल्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जालना : जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर झालेला असून वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेता शिक्षण विभागाने जिल्हयातील शाळा सोमवारपासून सकाळ सत्रात भरण्याचे आदेश काढले आहेत. परंतु, एक तास उशीराने शाळा सुटणार असल्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरवर्षी १५ मार्चपासून शाळा सकाळ सत्रात भरवल्या जात असत. मात्र यावर्षी भीषण दुष्काळीस्थिती, पिण्याचे पाणी व ग्रामीण भागात पत्राच्या शाळा यामूळे बीड, औरंगाबाबाद, बुलढाणा, लातूर सह मराठवाड्यात सर्वत्र १ मार्चपासून जि.प.च्या शाळा सकाळ सत्रात भरण्याचे आदेश सरकारने शिक्षण विभागाना दिले आहे. मात्र जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या आदेशाचे पालन केले नव्हते. विदयार्थ्यांची शारीरिक व मानसिक स्थिती पाहता व भौतिक सुविधांचा असलेल्या अभावामुळे जालना जिल्हयात देखिल शाळा सकाळाच्या सत्रात भरण्याची मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरली होती.
या मागणीची दखल घेत शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रात शाळा भरण्याबाबत आदेश काढले आहेत. परंतु, शाळेच्या वेळेमुळे शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सकाळी ७.३० ते दुपारी १ असा वेळ असल्याने शिक्षकामध्ये कमालीची नाराजी वाढली आहे. दुपारी १ नंतर विदयार्थ्यांना घरी जातांना उन्हाच्या झळा लागतील, शिवाय शिक्षणासाठी ग्रामीण भागातून अपडाऊन करणाऱ्या पायी व सायकलीवरील विद्यार्थ्याना याचा त्रास होणार आहे. बीड, लातुर, औरंगाबाद, बुलढाणा या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये १२ वाजेपर्यत शाळा भरत आहे.