गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कर्मचा-यांची सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात प्राथमिक आणि माध्यमिकच्या तब्बल साडेसहा हजार शिक्षकांचे सेवापुस्तिका आता आॅनलाईन होणार आहे. सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेमध्ये सुरु झाली आहे.सरकारी कर्मचाºयांच्या सेवेची संपूर्ण माहिती देणारे माध्यम म्हणजे त्यांचे सर्व्हिस बुक जुन्या पोथीसारखे दिसणारे सर्व्हिस बुक आता अस्तित्वहीन होणार आहे. कर्मचारी नोकरीत लागल्यापासून तो निवृत्त होईपर्यत बढती ग्रे पे. त्यांच्यावर झालेल्या कारवाईची इत्यंभूत महिती सेवापुस्तिकेत नोदविली जाते. त्यामुळे शासकीय विभागामध्ये कर्मचा-यांच्या सेवापुस्तिकेचे गठ्ठे पडलेले असतात.अनेकवेळा त्या गहाळ होतात. याला फाटा देत राज्य शासनाने प्रशासन गतिमान व्हावे, एका क्लिकवर कर्मचा-यांची इत्यंभूत माहिती तात्काळ मिळावी यासाठी शिक्षकासह जिल्हा परिषदेच्या वर्ग २, ३.४ या कर्मचाºयांचे देखील सर्व्हिस बुक आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सर्व्हिस बुक मधील सगळी माहिती आता आॅनलाईन सेव्ह राहणार असून, सरकारी कर्मचा-यांना सुटीचा अर्जसुध्दा आॅनलाईन टाकावा लागणार आहे. केंद्र व राज्य शासनाने ई - गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी अनेक कामे आॅनलाईन केल्या आहेत. यात निविदा प्रक्रियेपासून सेवार्थ प्रणालीपर्यंत सगळ्या प्रणाली आॅनलाईन केल्या जात आहे. आता कर्मचा-यांच्या सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जालना जिल्हा परिषदेत यासाठी आस्थापना स्तरावर नोडल अधिकारी, कर्मचा-यांची नेमणूक करुन युध्दपातळीवर कामाला सुरवात करण्यात आली आहे.
साडेसहा हजार शिक्षकांचे सर्व्हिस बुक होणार आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:12 AM