जालन्यावर दुष्काळाची छाया; भर पावसाळ्यात धावताहेत ४३ टँकर, १०९ विहिरींचे अधिग्रहण
By विजय मुंडे | Published: August 21, 2023 08:03 PM2023-08-21T20:03:28+5:302023-08-21T20:04:02+5:30
जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.८३ टक्के पाऊस झाला आहे.
जालना : ऑगस्ट महिना शेवटच्या टप्प्यात असला तरी वार्षिक सरासरीच्या केवळ ४५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई कायम असून, २७ गावे, १८ वाड्यांवरील ७२ हजार ३५ नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकर धावत आहेत. शिवाय पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १०९ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे.
चालू वर्षात आजवर वार्षिक सरासरीच्या ४०३.७१ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, त्या तुलनेत केवळ २७६.४० मिलिमीटर पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.८३ टक्के पाऊस झाला आहे. आठ-दहा दिवसांनंतर पडणाऱ्या रिमझिम पावसावर खरिपातील पिके तग धरून आहेत. परंतु, पिकांची अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकीकडे खरिपातील पिकांची चिंता असताना दुसरीकडे भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना २७ गावे १८ वाड्यांवरील ७२ हजार ३५ नागरिकांना करावा लागत आहे. संबंधित ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकर धावत असून, त्यांच्या ९७ खेपा मंजूर आहेत. त्याशिवाय टँकरसाठी व टँकरव्यतिरिक्त गावांसाठी अशा एकूण १०९ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा भीषण दुष्काळाच्या छायेत आला असून, पावसाची प्रतीक्षा शेतकरी, सर्वसामान्यांना लागली आहे.
५० प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर
जालना जिल्ह्यात केवळ ७ मध्यम आणि ५७ लघु प्रकल्प आहेत. त्यातील तब्बल ५० प्रकल्पांत मृत पाणीसाठा असून, हे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित १४ प्रकल्पांत केवळ ७.६५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. हे पाणीही एक महिनाभर पुरेल इतके आहे. यामुळे पाऊस पडला नाही तर पाणीटंचाईची भीषणता वाढणार आहे.
मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट
जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प आहेत. त्यात भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्प, अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात मृतसाठा आहे. जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्पात ४४ टक्के तर कल्याण मध्यम प्रकल्पात ४३ टक्के उपयुक्त पाणी आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ३४ टक्के, भोकरदन तालुक्यातील धामना प्रकल्पात १२ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा प्रकल्पात १६ टक्के उपयुक्त पाणी आहे.