कपाटाचे कुलूप तोडून रेकॉर्ड केले लंपास..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:53 AM2019-08-05T00:53:46+5:302019-08-05T00:54:17+5:30
ग्रामसेवकास शिवीगाळ करीत कपाटाचे कुलूप तोडून रेकॉर्ड लंपास केल्याप्रकरणी तीन ग्रामपंचायत सदस्यांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : ग्रामसेवकास शिवीगाळ करीत कपाटाचे कुलूप तोडून रेकॉर्ड लंपास केल्याप्रकरणी तीन ग्रामपंचायत सदस्यांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अंबड तालुक्यातील रूई ग्रामपंचायतीत शनिवारी सकाळी घडली.
रुई ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले ग्रामसेवक नंदकुमार मंदोडे हे शनिवारी सकाळी ग्रामपंचायतीत काम करीत होते. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब भगवान राजगुरू, ईश्वर भगवान धाईत, कृष्णा लिंबाजी खंडरे हे तेथे आले. ग्रामसेवक मंदोडे यांना ‘ग्रामपंचायत सभा घ्या’ अशी मागणी त्यांनी केली. मंदोडे यांनी एकच ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यामुळे कोरम पूर्ण होऊ शकत नाही. आजची सभा सविस्तर नोटीस काढून नंतर घेऊ, असे सांगितले. त्यावेळी संबंधितांनी ग्रामपंचायतचे रेकॉर्डची मागणी केली. ग्रामसेवकांनी रेकॉर्ड अलमारीत असल्याचे सांगत चावी नाही, सोमवारी रेकॉर्ड दाखवितो, असे सांगितले. त्यावेळी तात्यासाहेब राजगुरू, ईश्वर धाईत, यांनी अलमारी तोडून त्यामधील रेकॉर्ड काढून घेतले. मंदोडे यांनी विरोध केला असता संबंधितांनी शिवीगाळ केली. तसेच लोटलाटी करीत जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार ग्रामसेवक मंदोडे यांनी गोंदी पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून तात्यासाहेब भगवान राजगुरू, ईश्वर भगवानराव धाईत व कृष्णा लिंबाजी खंडरे (सर्व रा. रुई) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि उस्मान सय्यद हे करीत आहेत.