लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये, फळबागांसाठी ५० हजार रूपये अनुदान द्यावेत आदी विविध मागण्यांसाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन, मूग, बाजरी, उडीद आदी खरीप पिकांसह फळबागा उध्दवस्त झाल्या. अनेक शेतक-यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या. जिल्ह्यातील ६ लाख १५ हजार १६५ हेक्टर पेरणीखालील क्षेत्र आहे. पैकी सोयाबीनचे १ लाख २५ हजार ९६७ हेक्टर, कापूस २५ हजार हेक्टर, मका ४८ हजार ८१५ हेक्टर, बाजरी ७ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावर आहे. पैकी जवळपास ४ लाख ६५ हजार पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जालना तालुक्यातील ८१ हजार २१६ हेक्टर पैकी ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.शासनाने नुकसानीपोटी जाहीर केलेली मदत तोकडी आहे. त्यामुळे शेतक-यांना सरसकट प्रती हेक्टरी २५ हजार रूपये तर फळबागांना हेक्टरी ५० हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, गोदावरी खोरे विकास ममहामंडळाचे अध्यक्ष जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, पंडित भुतेकर, रावसाहेब राऊत, अॅड. भास्कर मगरे, पांडुरंग डोंगरे, महिला प्रमुख सविता किवंडे, संतोष मोहिते, दिपक रणनवरे, विष्णू पाचफुले, बबनराव खरात, हरिहर शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्या.कर्जवसुली तात्काळ थांबवासततचा दुष्काळ आणि यंदा झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी अनेक संकटात आहेत. शेतक-यांचा आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे बँकांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली आहे.
भरीव नुकसान भरपाईसाठी शिवसेनेने केली निदर्शने...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:44 AM