जालना : गायरान जमिनीच्या वादातून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना जालना तालुक्यातील रामनगर (सा.का.) कारखाना परिसरात शनिवारी रात्री घडली. संतोष ज्ञानदेव आढाव (वय ३३) असे मयताचे नाव आहे. गायरान जमिनीच्या वादातून चुलत्यानेच हा खून केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
जालना तालुक्यातील हडप सावरगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव आणि त्यांचे चुलते निवृत्ती आढाव यांच्यामध्ये रामनगर शिवारातील गायरान जमिनीचा वाद सुरू आहे. या वादातून शनिवारी रात्री संतोष आढाव यांच्यासह तिन जणांवर शनिवारी रात्री चुलत्यासह पाच जणांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि दगडांनी हल्ला केला. यावेळी झालेल्या बेदम मारहाणीत संतोष आढाव हे जागीच ठार झाले आहेत. तर अन्य दोघे गंभीर जखमी आहेत.
घटनेची माहिती कळताच परतुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत, मौजपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश धोंडे, राकेश नेटके यांच्यासह पोलिसांच्या फौजफाट्याने तातडीने घटनास्थळ गाठले. जखमींना तातडीने जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात संतोष आढाव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून मुख्य संशयित आरोपीस ताब्यात घेतले. या प्रकरणी जखमी संजय आढाव यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती आढाव, योगेश आढाव, दीपक जाधव आणि महिलेस अन्य एक या संशयितांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.