झारीतील शुक्राचार्य आरक्षण मिळू नये म्हणून कोर्टात जात आहेत : राजू शेट्टी
By विजय मुंडे | Published: September 11, 2023 03:37 PM2023-09-11T15:37:47+5:302023-09-11T15:38:05+5:30
सर्वात जास्त मराठा समाजाला शेती असल्यामुळे दुष्काळाची झळ मराठा समाजाला पोहचली आहे.
वडीगोद्री (जि. जालना) : झारीतील शुक्राचार्य हे आरक्षण मिळू नये म्हणू कोर्टात जात आहेत. मराठा आरक्षणासाठी एकट्या योध्याची ही लढाई नसून महाराष्ट्राची आहे. कष्टकरी शेतकरी त्यांच्या पाठीशी आहे. या सरकारला थोडा तरी पाझर फुटला पाहिजे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले.
शेट्टी यांनी सोमवारी अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. राजू शेट्टी यांनी आल्यानंतर 'मनोज जरांगे पाटील, आरक्षण योद्धा' ही टोपी घालात आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.
मराठा समाजाने वर्षानुवर्षे तोट्याची शेती केली आहे. सर्वात जास्त मराठा समाजाला शेती असल्यामुळे दुष्काळाची झळ मराठा समाजाला पोहचली आहे. मी संसदेत मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल आवाज उठवला होता. मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले तर समाज यांना मातीत घातल्याशिवाय राहणार नाही.लवकरात लवकर हक्काच आरक्षण मराठा समाजाला द्यावं. विरोध नसतांना जर आरक्षण मिळत नसेल तर सर्व पक्षीय नेते मंडळींनी आजच्या बैठकीत निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं. मी पाच वर्ष विधानसभेत आणि पाच वर्ष लोकसभेत काम केलेले आहे. त्यांना अध्यादेश काढण्यासाठी वेळ लागत नाही. मनोज तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. प्रामाणिक लढण्याऱ्या योद्धाची समाजाला गरज आहे, असेही ते म्हणाले.