लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवकाळी पावसाने हातातोंडांशी आलेला घास हिरवाल्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे. आता शिल्लक कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळणेही अवघड झाले आहे, रबी पेरणीही आता शक्य नसल्याने आम्हाला एकरी किमान २० हजाराची मदत मिळावी अशी मागणी जालना तालुक्यातील दरेगाव येथील महिला शेतकरी शांताबाई शेळके यांनी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांकडे केली.यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी कपाशी, मका तसेच बाजरीची पाहणी केली. तर गवळी पोखरी शिवारातील द्राक्ष बागांचीही पथकाने पाहणी केली. रविवारी या पथकाने कडेगाव, चांदई एक्को, अकालादेव येथेही भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.या पाहणी पथकाचे प्रमुख केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपगल व त्यांच्यासोबत डॉ. के मनोहरण, उपायुक्त संदानंद टाकसाळे, विभागीय सहसंचालक कृषी साहेबराव दिवेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा आरोरा, जिल्हा कृषी अधिक्षक बाबासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी सुखदेव, तलाठी आय. बी. सरोदे आदींची उपस्थिती होती.यावेळी दरेगाव येथील मका उत्पादनक शेतकरी कैलास ढवळे यांच्या शेतात मका तसाच पडून होता. आता तुम्ही रबीची पेरणी करणार काय, यावर शेतक-यांनी आता वेळ निघून गेल्याचे सांगून आता हे शक्य नसल्याचे सांगितले. दरेगाव येथील शांताबाई शेळके यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. शेतात जातांना आजही पाण्याचा वापसा न झाल्याने अधिका-यांना चिखालतून मार्ग काढावा लागला.यावेळी दीड एकर कापूस आम्ही लावला होता, असे सांगून यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे सांगितले. कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याची बाबही पथकाच्या लक्षात आणून देण्यात आली.यावेळी साहेबराव दिवेकर हे शेतक-यांना मराठीतून प्रश्न विचारून नंतर ते पथकातील अधिकाºयांना इंग्रजीतून भाषांतर करून सांगत होते. पीकविमा काढला आहे काय असा सवालही यावेळी पथकातील अधिका-यांनी केल्याचे दिसून आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नुकसान : द्राक्ष बागांची स्थिती दिसली गंभीरजालना तालुक्यातीलच गवळी पोखरी शिवारातील द्राक्ष बागांची पाहणीही पथकाने केली. यावेळी दीपक गंडाळ यांच्या द्राक्ष बागेत जाऊन पाहणी केली. त्यावेळी देखील मोठे विदारक चित्र त्यांना दिसून आले. गवळी पोखरी गावात न जाता रस्त्यावरील शिवारातच अधिका-यांच्या गाड्यांचा ताफा थांबून त्यांनी अवघ्या दहा मिनिटातच एक, दोन प्रश्नोत्तर विचारून पथक सुसाट निघून गेले. यावेळी गवळी पोखरीचे सरपंच गणेश वाघमारे, रवी कायंदे, कृषी सेवक विधाते, तलाठी चाळणेवार आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
‘साहेब... अवकाळी पावसाने सर्वच हिरावले’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:26 AM