जालना जिल्ह्यातील ६१७ जणांनी घेतली विषाची परीक्षा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:55 AM2019-10-06T00:55:39+5:302019-10-06T00:56:01+5:30
विजय मुंडे । लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कौटुंबिक, सामाजिक , आर्थिक अशा एक ना अनेक कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांचे ...
विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक अशा एक ना अनेक कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असल्याचे चित्र आहे. चालू वर्षात विषारी द्रव प्राशन केलेल्या तब्बल ६१७ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यात ३४९ पुरूष तर २६८ महिलांचा समावेश आहे. विषाची परीक्षा घेतलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला असून, इतरांना जिल्हा जिल्हा रूग्णालयात वेळेत औषधोपचार मिळाल्याने त्यांचे प्राण बचावले आहेत.
दुष्काळ, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले. हे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता विविध कारणांनी सर्वसामान्य नागरिक, महिलांच्या होणाºया आत्महत्या आणि त्याचे वाढणारे प्रमाण चिंतनीय आहे. जालना जिल्ह्यातही हे प्रमाण वाढताना दिसत आहे.
यात विषारी द्रव प्राषण करून आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. चालू वर्षात आजवर विषारी द्रव प्राषण केलेल्या ३४९ पुरूषांसह २६८ महिलांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यात जानेवारीत ४३ पुरूष, ४४ महिला, फेबु्रवारीत १९ पुरूष, १६ महिला, मार्चमध्ये २७ पुरूष, ३६ महिला, एप्रिलमध्ये ३१ पुरूष, २४ महिला, मे महिन्यात ३५ पुरूष ४ महिला, जूनमध्ये ३० पुरूष, २५ महिला, जुलैमध्ये ३९ पुरूष, ३५ महिला, आॅगस्टमध्ये ६१ पुरूष, ४९ महिला तर सप्टेंबर महिन्यात ६४ पुरूष आणि ३५ महिलांनी विष प्राशन केले होते. संबंधितांना प्रथमोपचारानंतर जालना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्हा रूग्णालयातील महिला, पुरूष वॉर्डमध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांनी वेळेवर केलेल्या औषधोपचारामुळे ६१७ पैकी ६१५ जणांचे प्राण बचावले आहेत. तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. विविध कारणांनी आत्महत्येचा प्रयत्न करणा-यांची वाढती संख्या रोखण्यासाठी सर्वच प्रशासकीय पातळीवरून गावा-गावात विशेष उपक्रम राबवून सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.
तिस-यावेळी झाला मृत्यू
विष प्राशन केल्यानंतर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. यातील एका महिलेने तीन वेळेस विष प्राशन केले होते. दोन वेळेस संबंधित महिलेचे प्राण बचावले. मात्र, तिस-यावेळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका वृध्द महिलेनेही विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली आहे.