विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दारूचे व्यसन, मोबाईलचा अति वापर आणि संशयीवृत्तीमुळे विवाहित दाम्पत्याच्या संसारात कलह निर्माण होत असल्याचे येथील महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल तक्रारींवरून समोर आले आहे. चालू वर्षातील नऊ महिन्यात तब्बल ५४८ तक्रारी दाखल झाल्या असून, पैकी २०८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यात ११८ प्रकरणात यशस्वी तडजोड झाली आहे.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथील महिला तक्रार निवारण केंद्र काम करीत आहे. दाम्पत्यांमध्ये दारू, संशयी वृत्ती, मोबाईलचा अती वापर, व्यसनाधीनता, हुंडा, सासरच्या मंडळींचा, सासूचा हस्तक्षेप आदी एक ना अनेक कारणांनी सतत भांडण, तक्रारी होतात. घरात न मिटणारी भांडणे थेट पोलीस ठाण्यापर्यंत जातात. मात्र, गुन्हा दाखल होण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन करण्यासाठी या तक्रारी महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल केल्या जातात. पती-पत्नीकडील नातेवाईक बोलावून त्यांना समज दिली जाते. शिवाय दाम्पत्यांचे म्हणणे ऐकूण घेत त्यांच्या तक्रारींचा निपटारा करून मोडकळीस आलेल्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी या केंद्रातील अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत.जालना येथील केंद्रात चालू वर्षात आजवर ५४८ प्रकरणे दाखल झाली होती. पैकी ११८ प्रकरणात यशस्वी तडजोड करून संसार पुन्हा सुरळीत करण्यासाठी मदत करण्यात आली आहे.८३ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली. ७ प्रकरणात कोर्ट समन्स देण्यात आले. अशी एकूण २०८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर ३४० प्रकरणे प्रलंबीत असून, याची सुनावणी सुरू आहे. तर याच केंद्रात सन २०१७ मध्ये ५४५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ३४२ प्रकरणात तडजोड करण्यात आली असून, १७ प्रकरणात कोर्ट समन्स देण्यात आली आहे. १८६ प्रकरणे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. २०१८ मध्ये ६८० तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ४२६ प्रकरणात तडजोड करण्यात आली. १६ प्रकरणे कोर्टात वर्ग करण्यात आली असून, २३८ प्रकरणे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली होती. मोडकळीस आलेले संसार पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्राच्या तत्कालीन प्रमुख सपोनि यमपुरे यांच्यासह कार्यरत प्रमुख पोउपनि एस.बी.राठोड, पोकॉ एम.ए.गायकवाड, एन.ए.शेख, एस.बी.राठोड, जे.जी.पवार, पोकॉ एम.आर.शेख आदी परिश्रम घेत आहेत.
मोडकळीस आलेल्या ११८ संसारांमध्ये फुलले हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:10 AM