विद्यार्थ्यांनी तयार केली सौर ऊर्जेवरील सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:47 PM2020-03-17T23:47:41+5:302020-03-17T23:47:51+5:30
अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : पेट्रोल, डिझेलच्या वाहनांना पर्याय म्हणून अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे. अशा सायकलींच्या वापरामुळे पेट्रोल वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करता येणार आहे.
अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्युत विभागात शिकणा-या अशोक कोटंबे, अभिषेक लांडे, शांभवी जपे, आकांक्षा काठमांडे, दिप्ती चावरे या पाच विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे. यासाठी त्यांना त्यांचे शिक्षक डी. एस. बनसोड यांनी मार्गदर्शन केले. सौर ऊर्जेवर चालणारी सायकल या त्यांच्या प्रयोगाने विद्यार्थ्यांना स्वत:च्या क्षमतेची ओळख निर्माण करून दिली आहे. सौर ऊर्जेवर एक तासात ३० किलोमीटर अंतर या सायकलने गाठता येते. तापमानात बदल घडून आल्यास पायंडल मारूनही सायकल चालविता येऊ शकते. ही सायकल तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सोलर संच, बॅटरी, कंट्रोलर, डीसी मोटर आदी साहित्यांचा वापर केला असून, जवळपास २० हजार रूपये खर्च आला आहे. या सायकलीला समोर लाईट, हॉर्न आणि इलेक्ट्रिक ब्रेक्स आहेत. त्यामुळे रात्रीच्या प्रवासातही या सायकलाचा वापर करता येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही सायकल तालुक्यातील नागरिकांसाठी कौतुकाचा विषय ठरत असून, या सायकलवर विद्यार्थी अंबड ते अंतरवाली सराटी हा प्रवास करीत नागरिकांना माहिती दिली आहे.
अशोक आणि त्यांच्या मित्रांचे आई-वडील मजुरी करतात. त्यांना पुढील उच्चशिक्षण घेण्याची इच्छा आहे. मात्र, घरात आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अर्ध्यातच शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. मात्र, मुलांनी तयार केलेली सायकल पाहून त्यांंना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अशोक कोटंबेच्या पालकांनी सांगितले.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या मुलांनी आपल्या संकल्पनेतून सौर ऊर्जेवर चालविणारी सायकल तयार केली आहे. या मुलांच्या कर्तृत्वाला चालना मिळण्यासाठी शासनाने विविध योजनांद्वारे आर्थिक मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.