प्रशासन राबवणार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:57 AM2019-11-26T00:57:28+5:302019-11-26T00:57:50+5:30

घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली असून, यासाठी प्रशासनाने बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला आहे.

Solid waste management project to be implemented by the district administration | प्रशासन राबवणार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

प्रशासन राबवणार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

googlenewsNext

जालना : गावातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली असून, यासाठी प्रशासनाने बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पाला यश मिळाले असून, पहिल्या टप्प्यात बदनापूर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
स्वच्छेतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन देशभरात राबविले. याला देशवासियांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परंतु, ग्रामीण भागात अद्यापही म्हणावी, तशी स्वच्छेतेबाबत जनजागृती झालेली नाही. त्यामुळे आजही गावांमध्ये कचरा रस्त्यावरच पडलेला दिसत आहे. या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
रासायनिक खतांचा वापर टाळून जास्तीत- जास्त सेंद्रीय खतांचा वापर व्हावा व गावात होणा-या कच-याचे रूपांतर सेंद्रीय खतात व्हावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा यांनी हा प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे. गुजरातमधील नेपरा कंपनीच्या मदतीने बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला. येथे या प्रयोगाला यश आले असून, पहिल्या टप्प्यात बदनापूर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. बदनापूर तालुक्यात यशस्वी झाल्यानंतर जिल्हाभरातील सर्व गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येईल. यासाठी १५० कुटुंब असलेल्या ग्रामपंचायतीला ७ लाख, ३०० कुटुंब असलेल्या ग्रामपंचायतीला १२ लाख, ५०० कुटुंब असलेल्या ग्रामपंचायतीला १५ लाख व ५०० पेक्षा जास्त कुटुंबे असलेल्या ग्रामपंचायतीला २० लाख रुपये दिले जाणार असल्याचे स्वच्छ भारत मिशनच्यावतीने सांगण्यात आले.
तसेच महिलांनी तयार केलेल्या खताला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
दरम्यान, हा प्रकल्प बदनापूर तालुक्यात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. यासाठी महिला बचत गटांची मदत घेण्यात येत असून, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींना निधी देखील देण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी नेमण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
अजैविक कच-याचे करणार संकलन
ग्रामीण भागात पडलेल्या प्लास्टिक, रबर यासारख्या अजैविक कच-याचे संकलन करण्यात येणार आहे. हा संकलीत केलेला कचरा बदनापूर येथील पंचायत समिती परिसरात आणून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर जमा झालेला कचरा खाजगी कंपनींना विकण्यात येणार असल्याचेही सीईओ अरोरा यांनी सांगितले.
महिला बचत गटांना प्रशिक्षण
हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी ही महिला बचत गटांवर दिली आहे. यासाठी प्रत्येक गावातील चांगल काम करणा-या बचत गटाची निवड करण्यात आली आहे. या महिलांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना आपल्या गावात हा प्रकल्प राबवायचा आहे. बदनापूर तालुक्यातील महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यात आले असून, लवकरच प्रकल्प राबविण्यास सुरूवात होणार आहे. तसेच इतर तालुक्यातील महिलांनाही लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Web Title: Solid waste management project to be implemented by the district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.