चोरीच्या वाहनांचे लाखो रुपयांचे सुटे भाग जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:56 AM2018-11-25T00:56:18+5:302018-11-25T00:56:40+5:30
जुना मोंढ्यातील एका गॅरेजमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० चारचाकी वाहनांचे चोरी झालेले इंजिन व खुल्या पार्ट्सचा साठा जप्त केला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील जुना मोंढ्यातील एका गॅरेजमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० चारचाकी वाहनांचे चोरी झालेले इंजिन व खुल्या पार्ट्सचा साठा जप्त केला आहे. गोडाऊनचा मालक संशयित मजहर नजीर खान (४०, रा. कालीकुर्ती) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ९ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राऊतनगर येथील एका गॅरेजवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला. या गॅरेजमध्ये विविध कंपन्याच्या चारचाकी वाहनांचे े१५ पंधरा इंजिन तसेच चारचाकी वाहने खोलून वाहनांचे खुले भाग आढळून आले. त्यानंतर मजहर नजीर खान याला आरटीओ परवानगी बाबत विचारणा केली असता, त्यांने परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. दरम्यान, शनिवारी या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या गॅरेजमध्ये १५ विविध कंपनीच्या चारचाकी वाहनाचे इंजिन, गेअर बॉक्स, इंजिन हेड, सेल्फ स्टार्टर, कंन्डेसर यासह इतर विविध सुट्टे भाग असा एकूण ९ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.