लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : येथील चार एकर द्राक्ष बागेवर कोणी अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने दोन शेतकऱ्यांचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान दुष्काळात हा घाला आल्याने दोन्ही शेतकरी हतबल झाले असून त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत माहिती अशी की येथील गट क्रमांक २६२ मध्ये शंकर खोत व रवींद्र खोत यांची शेती आहे. फळबागेकडे वळलेल्या या शेतक-यांनी आपल्या शेतात प्रत्येकी दोन एकर द्राक्ष बाग लावली आहे. मोठ्या कष्टाने कलमा बांधून ठिबकवर हे शेतकरी या बागा जगवित होते. मात्र सोमवारी पहाटे शंकर खोत हे द्राक्ष बागेत गेले असता त्यांना द्राक्षाच्या वेली पिवळ्या पडलेल्या दिसल्या. बारकाईने पाहीले असता त्यांच्या संपूर्ण बागेसह शेजारील त्यांचे काका रवींद्र खोत यांच्याही बागेत हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. कोणीतरी अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळी या दोन्ही बागेवर तणनाशक फवारुन दूषित भावनेने बाग उद्धस्त केल्याचे त्यांना कळले.मार्च महिन्यात लावलेल्या या बागांवर आतापर्यंत जवळपास चार लाख रुपये खर्च झाल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. लेकराप्रमाणे वाढविलेले ही द्राक्ष बाग ऐन दुष्काळात कोणीतरी उद्धस्त केल्याने हे शेतकरी हतबल झाले आहे. दरम्यान तहसीलदारांसह टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवून कारवाईची मागणी शेतकरी शंकर खोत व रवींद्र खोत यांनी केली आहे. याकडे पोलीसांनी अद्या लक्ष दिले नाही.
तणनाशक फवारल्याने द्राक्ष बागेचे चार लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 12:11 AM