चौदा विद्यार्थ्यांवर पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:47 AM2019-02-26T00:47:04+5:302019-02-26T00:47:29+5:30
जालन्याजवळील इंदेवाडी येथील एका विद्यालयात चक्क नऊ विद्यार्थी कॉपी करताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून यंदा एसएससी बोर्डाने अधिकची खबरदारी घेतीली आहे. सोमवारी भौतिक शास्त्र आणि राज्यशास्त्र विषयाचा पेपर होता. जालन्याजवळील इंदेवाडी येथील एका विद्यालयात चक्क नऊ विद्यार्थी कॉपी करताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.
बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी करण्याचे प्रकार सुरू आहेत. कितीही सूचना दिल्यावरही विद्यार्थी मोठ्या हातचलाखीने कॉपी सोबत आणत असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. प्रारंभी परीक्षा केंद्रावर येतानाच विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्याचे निर्देश आहेत. अशाही स्थितीत विद्यार्थी शक्कल लढवून कॉपी परीक्षा केंद्रात आणत आहेत. सोमवारी इंदेवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात भरारी पथकाने सकाळच्या सत्रात अचानक भेट दिली. भरारी पथक आल्याचे कळल्यावर विद्यार्थ्यांची मोठी तारंबळ उडाली. प्रत्येक विद्यार्थ्यांची वर्गात पुन्हा कडक तपासणी करण्यात आल्यावर जवळपास नऊ विद्यार्थ्यांनी पाकीट डायरी प्रमाणे गाईडची पाने झेरॉक्स करून आणल्याचे दिसून आले.
प्रारंभी आमच्याकडे काहीच नाही, असे विद्यार्थ्यानी सांगितले. परंतु नंतर सर्वांचे खिसे तपासण्यात आले असता, कोणी कॉप्या या बुटाच्या मोज्यात दडवल्याचे दिसून आले. एकूणच या प्रकरणी नऊ विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर विद्यालयाप्रमाणेच सरस्वती भुवन विद्यालयातही तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना ताब्यात घेतले असून, उर्दू हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्याचे माहिती अनिल भेरे आणि भारत पालवे यांनी दिली.
जिल्ह्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयेही ग्रामीण भागात आहेत. असे असतानाच अनेक कनिष्ठ महाविद्यालयांकडे स्वत:ची विज्ञानाची लॅब नाही. त्यातच प्रात्यक्षिक परीक्षा घेताना त्या केवळ कागदोपत्री घेण्यात आल्याचे वास्तव आहे. या प्रात्यक्षिक परीक्षेची खऱ्या अर्थाने चौकशी झाल्यास मोठे गंभीर परिणाम पुढे येणार आहेत. परंतु शिक्षण विभागात आणि संस्थाचालकांचे साटेलोटे असल्याने प्रात्यक्षिक परीक्षांकडे कोणीच गंभीरतेने पाहत नसल्याचे दिसून आले. एकूणच विद्यार्थ्यांचे नुकसान कशाला करायचे, अशी सबब सांगून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परंतु यातून विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे.
दक्षता : सहा भरारी पथके
जालना जिल्ह्यात यंदा इयत्ता बारावी परीक्षेसाठी जवळपास २९ हजार विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या लक्षात घेता सहा भरारी पथकांसह बैठी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. परीक्षा सुरू झाल्यापासून जवळपास १९ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.