विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दीपावलीच्या कालावधीत जिल्ह्यातील एसटी महामंडळ मालामाल झाले आहे. चार आगारांमधून एस.टी. महामंडळाला पाच कोटी तीस लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा महामंडळाच्या उत्पन्नात ३० लाख रूपयांची अधिक वाढ झाली आहे.दरवर्षी दीपावलीची चाहुल लागताच नोकरदार वर्गाचे पाऊल सहजच गावाकडे ओढले जाते. असंख्य नागरिक नातेवाईकांच्या गाठी- भेटी घेतात. आजही बसचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जात असल्याने प्रवासी बसलाच अधिक प्राधान्य देत आहे. यंदा २७ आॅक्टोबर रोजी दीपावली लक्ष्मीपूजन होते.यामुळे २५ आॅक्टोबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान एसटी. महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी बसचे नियोजन केले होते. यात जालना- कोल्हापूर- पुणे, जालना- ब-हाणपूर, परतूर- परभणी- गेवराई- तुळजापूर, अंबड- तुळजापूर या मार्गावर चारही आगारातून अधिक बस सोडण्यात आल्या होत्या. यात विविध बसचे १५ लाख ४२ हजार किलोमीटरचे अंतर झाले आहे.यातून महामंडळाला पाच कोटी ३० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बस प्रवासादरम्यान प्रवाशांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.मागील वर्षी दीपावलीच्या कालावधीत १५ लाख किलोमीटर अंतरावर विविध बस गेल्या होत्या. यातून पाच कोटी रूपयांचे उत्पन्न एसटी. महामंडळाच्या जालना विभागाला मिळाले होते.यंदा या उत्पन्नात ३० लाख रूपयांची वाढ झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जालना आगार प्रथमजिल्ह्यातील चार आगारांपैकी जालना आगार यंदा उत्पन्नाच्या बाबती आघाडीवर राहिले आहे. या आगाराला एक कोटी ८० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सर्वात कमी उत्पन्न परतूर आगाराला मिळाले आहे. या आगाराला फक्त ९० लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. अंबड आगाराला एक कोटी ५० लाख तर जाफराबाद आगाराला एक कोटी ३० लाख रूपयांचे उत्पन्न दीपावली कालावधीत मिळाले आहे.‘ती’ बस सुरूचजालना आगारातून दीपावलीच्या कालावधीत जालना- ब-हाणपूर बस सुरू करण्यात आली होती. ही बस यापुढेही सुरू आहे. सकाळी ही बस जालना आगारात साडेसहा वाजत लागत आहे. यानंतर चिखली- बुलडाणा- मुक्ताईनगर या मार्गे ही बस जात आहे. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
दीपावलीच्या कालावधीत एसटी मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:41 AM