राज्याने केंद्रावर खापर फोडू नये : दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:30 AM2021-04-25T04:30:20+5:302021-04-25T04:30:20+5:30
जालना : कुठल्याही बाबतीत राजकारण करणे हे भाजपचे ध्येय नाही. तुमचे मंत्री हे पोलीस दलातील अधिकाऱ्यामुळे अडचणीत आले आहेत, ...
जालना : कुठल्याही बाबतीत राजकारण करणे हे भाजपचे ध्येय नाही. तुमचे मंत्री हे पोलीस दलातील अधिकाऱ्यामुळे अडचणीत आले आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी ही न्यायालयाच्या आदेशाने होत आहे. त्यात आमचा कुठलाच हेतू नाही. तसेच रेमडेसिविर व कोरोना प्रतिबंधक लस आणि ऑक्सिजनबाबतही जे आरोप राज्य सरकारकडून केले जात आहेत, ते निराधार असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. शनिवारी दुपारी दानवे हे जालन्यात आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, राज्यात कोरोनाची साथ आटाेक्यात आणण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. अधिकाधिक चाचण्यांचा वेग हा आता कुठे वाढवला आहे. तसेच गृह अलगीकरणातील संशयित रूग्णांवर लक्ष न ठेवल्याने तेच खरे स्प्रेडर निघाले. आज कोरोनाने रौद्ररूप धारण केले आहे. या कोरोना काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार घटला असून, एकही निर्णय स्पष्ट नसल्याने सर्वत्र संभ्रम आहे. कुठली गोष्ट ही राज्याने स्वत: करण्याऐवजी उठसूठ केंद्र सरकारवर आरोप करून स्वत:चा कमीपणा झाकण्याचा हा प्रयत्न गेल्या दोन महिन्यांपासून राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री करत आहेत. परंतु, जनता सर्वकाही जाणून आहे. त्यामुळे केंद्राच्या नावाने बोटे मोडून काहीही फरक पडणार नसल्याचे दानवे म्हणाले. शनिवारी दानवे यांनी जिल्हा सरकारी रूग्णालय परिसरात निवारा केंद्राची पाहणी करून भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, सिध्दीविनायक मुळे, संजय देठे, आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावाही घेतला.
चौकट
अन्नधान्याचा मुबलक साठा देणार
कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आपण आपल्या अन्न मंत्रालयाकडून गरिबांना गहू तसेच तांदळचा मोठा साठा उपलब्ध करून दिला आहे. आगामी दोन महिने रेशनकार्डधारकांना पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ हा अतिरिक्त देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकार आता आमच्यावर आरोप करू शकत नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील सीबीआयचे छापे हा तपासाचा भाग आहे, त्यात कसले आले राजकारण, असा उलट सवाल रावसाहेब दानवेंनी केला.