मतदार दिनातून लोकशाही बळकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:53 AM2020-01-26T00:53:17+5:302020-01-26T00:54:46+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भारत हा लोकशाही प्रधान देश असून, या देशात निवडणुकांच्या माध्यमातून आपण लोकशाही अधिक बळकट करतो. तरुणांमध्ये लोकशाहीचे बिजारोपण करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस महत्वाची भूमिका बजावतो, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बसैय्ये, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, गटशिक्षणधिकारी विठ्ठल जायभाये, पोलीस निरीक्षक निशिकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी देवडे यांची उपस्थिती होती.
परळीकर म्हणाले, शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक शालेय वयात केल्यास निश्चितच आगामी काळात लोकशाही अधिक बळकट होईल व यातून मतदानाची टक्केवारी वाढेल. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, डाटा एंट्री आॅपरेटर, निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धेत बक्षिस प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा देण्यात आली.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंजली कानडे यांनी गांधी चमन येथून हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, विद्यार्थिंनी, पोलीस बँड पथक, एस.आर.पी.एफ.चे जवान आदींनी सहभाग नोंदविला.