जालना : चोऱ्यांसह विविध गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला सदर बाजार पोलिसांनी शुक्रवारी हद्दपार केले आहे. राजू विठ्ठल शेळके (३०) असे त्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.
राजू शेळके हा शहरातील लोधी मोहल्ला येथील रहिवासी आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्याविरोधात चोरी, जबरी चोरी, घरफोडी यासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात सदर बाजार पोलिसांनी यापूर्वी देखील प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, तरी देखील त्याचे गुन्हेगारी कृत्य बंद न झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी राजू शेळके (३०) याच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केला होता.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी या तडीपार प्रस्तावास मान्यता दिली. पोलिसांनी अट्टल गुन्हेगार राजू शेळके याचा शोध घेऊन त्याला नाशिक जिल्ह्यात नेऊन सोडण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलिस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोलिस हेडकाॅन्स्टेबल सुभाष पवार, पोलिस हेडकाॅन्स्टेबल जगन्नाथ जाधव, पोलिस हेडकाॅन्स्टेबल सोमनाथ उबाळे, पोकाॅ. मनोहर भुतेकर, पोकॉ. भरत ढाकणे, पोकॉ. संतोष जाधव, पोकॉ. विलास पवार यांनी केली आहे.