एसटीला ५० लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:45 AM2018-08-02T00:45:59+5:302018-08-02T00:46:38+5:30
आषाढी एकदशी निमित्त परिवहन महामंडळाकडून जिल्हाभरातून १७० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, यात्रे दरम्यानच मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. परिणामी जालना विभागाला याचा चांगलाच फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत विभागाला ५० लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आषाढी एकदशी निमित्त परिवहन महामंडळाकडून जिल्हाभरातून १७० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, यात्रे दरम्यानच मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. परिणामी जालना विभागाला याचा चांगलाच फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत विभागाला ५० लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला जातात. त्यांच्या सवयीसाठी एसटी महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
मागील वर्षीही महामंडळाने १५० गाड्यांचे नियोजन केले होते. त्यापैकी १३० च गाड्या रस्त्यावर धावल्या. या गाड्यांच्या १,१२० फेऱ्या झाल्या.
या गाड्यांनी ३ लाख १८ हजार किलोमीटरचे अंतर पार केले. यातून महामंडळाला ८४ लाख ४९ हजारांचे उत्पन झाले. त्यानुसार यावर्षीही महामंडळाकडून जालना, परतूर, अंबड, जाफराबाद या बसस्थानकातून १७० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. यापैंकी फक्त १२५ च बसेस रस्त्यावर धावल्या. परंतु, यात्रे दरम्यानच मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आंदोलन पुकारले होते.
परिणामी, यावर्षी जालना विभागाच्या फक्त ३६८ बस फे-या झाल्या. तसेच या गाड्यांनी १ लाख ५ हजार ९४७ किलोमीटर अंतर पार केले.
यातून ३५ लाख २९ हजारांचे उत्पन्न जालना विभागाला मिळाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जालना विभागाला तब्बल ५० लाख २० हजारांचे नुकसान सोसावे लागले आहे.
राजूर यात्रा : ५ लाखांचे उत्पन्न
अंगारकी एकदशी निमित्त राजूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी जातात. या भाविकांच्या सवयी साठी महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. या गाड्या जालना, परतूर, जाफराबाद, अंबड येथील बसस्थानकांतून सोडण्यात आल्या. या गाड्यांनी ४२८ फे-या केल्या असून, त्या १७ हजार ३९० किलोमीटर धावल्या. यातून महामंडळाला ५ लाख ९७ हजार ३१४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात जालना बसस्थानकातून १८० फे-या झाल्या असून, १ लाख ९५ हजारांचे उत्पन्न, तसेच जाफराबाद ५२ फे-या, ७४ हजार ५४८ उत्पन्न, परतूर ४८ फे-या, ५२ हजार ४७५ रुपयांचे उत्पन्न, अंबड १४८ फे-या, २ लाख ७४ हजार ४९२ रुपयांचे उत्पन्न झाले आहेत.