विद्यार्थ्यांचा जुई प्रकल्पातून दोन किलोमीटरचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:45 AM2019-11-24T00:45:38+5:302019-11-24T00:45:56+5:30
मुख्य रस्ता जुई मध्यम प्रकल्पात गेल्याने आणि प्रकल्प भरलेला असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज होडीद्वारे दोन किलोमीटरचा प्रवास पाण्यातून करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील सुरंगळीवाडी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरंगळी गावात जावे लागते. मात्र, मुख्य रस्ता जुई मध्यम प्रकल्पात गेल्याने आणि प्रकल्प भरलेला असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज होडीद्वारे दोन किलोमीटरचा प्रवास पाण्यातून करावा लागत आहे. गत दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांची ही जीवघेणी कसरत सुरू असून, एखादी मोठी घटना घडल्यानंतर प्रशासन याकडे लक्ष देणार का, असाच संतप्त प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
जवळपास ५०० लोकवस्ती असलेल्या सुरंगळीवाडी गावात आठवीपर्यंत शाळा आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी येथील १० ते १५ विद्यार्थ्यांना सुरंगळी येथील काशी विश्वेश्वर विद्यालयात जावे लागते. सुरंगळी ते सुरंगळीवाडी या दरम्यान तीन किलोमीटर अंतर आहे. मात्र, जुई प्रकल्पाची निर्मिती झाली आणि रस्ता प्रकल्पात गेला. प्रकल्प भरला की, हा रस्ता पाण्याखाली जातो. सुरंगळवाडी गावात बस येत नाही. त्यामुळे प्रकल्पातील होडीचा आधार घेऊनच प्रवास करावा लागतो. दुसरा मार्ग दानापूर मार्गे जातो. मात्र, १५ किलोमीटर अंतर पार करून सुरंगळी गावात जावे लागते. त्यातही सुरंगळवाडी ते दानापूर हा दहा किलोमीटरचा रस्ता असून नसल्यासारखा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना होडीतून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही !
जुई प्रकल्पातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या होडीला चालविण्यासाठी प्रशिक्षित नावाडी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा ग्रामस्थांना होडी चालवावी लागते. कधी दोरी व्यवस्थित बांधलेली नसते तर कधी होडी जलपर्णीत अडकते. अशा एक ना अनेक समस्यांवर मात करीत आठवीच्या पुढील शिक्षण घेण्यासाठी येथील १० ते १२ विद्यार्थ्यांना २० ते ३० फूट पाणी असलेल्या जुई प्रकल्पातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मागील दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे.
ग्रामस्थांच्या मागणीकडे कोणीही लक्ष देईना
या प्रकल्पातून मोठा पूल तयार करावा किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी गत अनेक वर्षापासून ग्रामस्थ करीत आहेत. मात्र, प्रशासन या मागणीला गांभीर्याने घेत नाही. १० ते १२ विद्यार्थी दररोज जीवघेणा प्रवास करतात. ग्रामस्थांचे हेच हाल त्यातच एखाद्या रूग्णाला दवाखान्यात न्यायचे म्हटले तर अडचणींचा डोंगर सर करावा लागतो. सुरंगळीवाडी गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी जीवघेणी कसरत पाहता प्रशासनाला जाग येणार तरी कधी, हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.