भोकरदन : आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता त्यांना संगणक ज्ञान मिळावे, शिक्षणानंतर व्यावसायिक म्हणून उभा राहता यावे यासाठी पायाभूत सुविधा उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून संगणक व शिवणकला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
तालुक्यातील जवखेडा खु. येथील कै. दशरथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इंडिया पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संगणक आणि शिवणकला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन शनिवारी दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास आमदार संतोष दानवे, आयपीजीएचे अध्यक्ष जितू भेडा, उपाध्यक्ष बिमल कोठारी, मानद सचिव सुनील सावला, दिनेश मिश्रा, संजय अग्रवाल, घनशाम गोयल, सुनील रायठ्ठा, अर्जुन गेही आदींची प्रमुख उपस्थिती होती. आयपीजीएने यापूर्वीही भोकरदन तालुक्यातील १० गावात जल पुनरूज्जीवनाचा प्रकल्प राबविला आहे. त्यामुळे अनेक गावांमधील पाणीप्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. दुष्काळात नदी, नाले खोलीकरण, रुंदीकरण केले. त्यामुळे गिरजा नदीवर ५० किलोमीटर, तर पूर्णा नदीवर २५ किलोमीटर पाणी उपलब्ध आहे. आता शैक्षणिक क्षेत्रात ही मदत सुरू केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणासह त्यांचे कौशल्य विकसित व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित गावंडे यांनी केले. कार्यक्रमास सरपंच मधुकर दानवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आत्माराम सुरडकर, प्राचार्य अमोल कड, सहशिक्षक संदीप साबळे, बाबूसिंग शेवगण, विठ्ठल दळवी, विष्णू सोरमारे, भारत दाभाडे, सचिन गोरे, गजानन जाधव, कृष्णा बदर आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थी, पालकांनी लाभ घ्यावा
दुष्काळात इंडिया पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशनच्या वतीने जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यांनी आता शिक्षण क्षेत्रासाठीही योगदान दिले आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांसह पालकांनीही घ्यावा, असे आवाहन आमदार संतोष दानवे यांनी यावेळी केले.