९० दिवसांत विद्यार्थी बोलणार उर्दू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:42 AM2019-01-26T00:42:16+5:302019-01-26T00:42:52+5:30
उर्दू माध्यमाच्या शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना उर्दू भाषा बोलता येत नाही. ते विद्यार्थी आता ९० दिवसात परिपूर्ण उर्दू भाषा बोलणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उर्दू माध्यमाच्या शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना उर्दू भाषा बोलता येत नाही. ते विद्यार्थी आता ९० दिवसात परिपूर्ण उर्दू भाषा बोलणार आहेत. कारण, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेद्वारे जिल्ह्यातील १०० उर्दू शाळांमधील २०० शिक्षकांची मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम यावर आधारित कार्यशाळा घेण्यात आली आहे. ही कार्यशाळा तीन दिवसीय झाली असून याचा समारोप बुधवारी झाला आहे. दरम्यान ७० शाळांना साहित्य पेटीचे वाटप करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे उर्दू भाषा बोलता यावी, यासाठी या शिक्षकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित व अंशता अनुदानित अशा एकूण १०० शाळांमधील २०० शिक्षकांना १२ तज्ज्ञ व्यक्तींनी हे प्रशिक्षण दिले. यातील जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या ७० उर्दु माध्यामाच्या शाळांना साहित्य पेटी देण्यात आली. या पेटीत ३ हजार ५०० प्रकराचे साहित्य असून ५० उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना याचा उपयोग करता येणार आहे.
या साहित्य पेटीची मूल संकल्पना जालना जिल्ह्याची असून मागील वर्षी या पेटीचा स्टॉल औरंगाबाद येथे आयोजित ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमात लावण्यात आला होता. या उपक्रमाचे सर्वस्तरावरुन कौतुक झाले असल्याने आता हा प्रकल्प भाषेचे उपसंचालक विद्या प्राधिकरण डॉ. जगराम भटकर तसेच भाषा विभागातील उर्दूचे तौसिफ परवेज आणि प्राधिकरणाचे संचालक सुनील मगर यांच्या अध्यक्षतेखाली याचे प्रशिक्षण राज्यभर राबविले जात आहे. हा प्रकल्प मुहूर्त स्वरूपात आणण्यासाठी विकास संस्थेचे उर्दू विभागाचे फय्याज शेख यांनी प्रयत्न केले आहे.
खऱ्या अर्थाने या प्रकल्पाची संकल्पना जालना जिल्ह््याची आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने या साहित्यपेटीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मत डॉ. प्रकाश मांटे यांंनी व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या समारोप्रसंगी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. सुनीता राठोड यांनी उर्दू शिक्षकांना प्रत्येक मुलाला उर्दू वाचता आली पाहिजे, यासाठी प्रत्येक शिक्षकाने दक्ष राहिले पाहिजे, असे सांगितले. दरम्यान डॉ. वैशाली जहागीरदार, सतीश सातव, गफ्फार शेख आदींची उपस्थिती होती.