रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या पाचही पोलिसांचे निलंबन मागे; गृहमंत्र्यांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 11:04 AM2021-06-19T11:04:23+5:302021-06-19T11:10:11+5:30
कुठलेच कायदेशीर आदेश नसताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयात पोलिसांनी झडती घेतली होती.
जालना : कुठलेच कायदेशीर आदेश नसताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयात पोलिसांनी झडती घेतली होती. या प्रकरणी दोन पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्यानं संबंधित पोलीस स्थानकात खळबळ उडाली होती. मात्र आता पाचही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या निवेदनानंतर गृहमंत्र्यांनी निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. या वेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. अर्जुन खोतकर यांचे गृहमंत्र्यांनी सर्व प्रकरण ऐकून घेतले. यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची कोणतीच चूक नव्हती. अशा प्रकारे जर पोलिसांवर जर चुकीची कारवाई होत असेल तर पोलिसांनी काम कसे करावे, असा सवाल खोतकर यांनी वळसे पाटील यांना केला. त्यानंतर वळसे पाटील यांनी हे निलंबन मागे घेण्यात येईल, असा शब्द दिला होता. त्यानंतर आज संबंधित पाचही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले.
मंत्रालय, मुंबई येथे अर्जुन खोतकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत चर्चा केली. जाफ्राबाद प्रकरणी पोलिसांची काहीच चूक नसतांना कारवाई करण्यात आली व पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी खोतकर यांनी केली. यावेळी मा.आ.चंद्रकांत दानवे दिसत आहे.@ShivSena@Dwalsepatilpic.twitter.com/zfiln9UyUy
— Arjun Khotkar (@miarjunkhotkar) June 17, 2021
११ जून रोजी जाफराबाद येथे केंद्रीय राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. तेथे जाऊन जाफराबाद येथील पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, युवराज सुभाष पोठरे हे दोन पोलीस उपनिरीक्षक आणि जमादार मंगलसिंग रायसिंग सोळंके, सचिन उत्तमराव तिडके आणि महिला पोलीस कर्मचारी शबाना जलाल तडवी यांनी कायदेशीर आदेश नसताना झाडाझडती घेतली. याप्रकरणी दानवे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. चौकशी अंती पाचही पोलीस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सोमवारी निलंबित केले. या निर्णयाने संपूर्ण पोलीस दल हादरले आहे.
काय आहे प्रकरण?
कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी ११ जूनला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदा झाडाझडती घेतली. अशाच प्रकारे पोलिस खात्यात जनमानसात प्रतिमा मलिन होण्यास कारणीभूत होऊन कर्तव्यात बेकायदा व बेशिस्तीचे वर्तन केले, असा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशीअंती २ पोलिस उपनिरीक्षक व ३ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. याबाबत दानवे यांनी यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसंच कामकाजाच्या संचिका देखील सोबत नेल्या अशी लेखी तक्रार केली होती.