लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अनेक प्रकरणांमध्ये आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात त्याला होणाऱ्या शिक्षेचे प्रमाण हे सध्या पाहिजे तेवढे नाही. हे प्रमाण वाढविण्यासाठी ज्यावेळी न्यायालयात संबंधित आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल करताना ते कायद्याच्या दृष्टीने कसे टिकेल, गुन्ह्यातील साक्षीदार फितूर कसे होणार नाहीत, याची काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण दोन दिवसांच्या तपासणी कार्यक्रमा अंतर्गत अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना दिले.गेल्या दोन दिवसांपासून सेठ यांनी जालना पोलिसांचा सूक्ष्म आढावा घेतला. तसेच त्यांना आगामी काळात घ्यावयाची काळजी या संदर्भात सूचना दिल्याचे ते म्हणाले. विधासभा निवडणुका, बकरी ईद, गणेश उत्सव, नवरात्र आदी सणवार येणार आहेत. ते शांततेत पार पडावेत म्हणून समाजातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना प्रतिबंधित करणे, यासह त्या काळात साध्या वेशात पोलिसांना ठेवून समाजात काय चालले आहे, याचा आढावा घेणार आहोत. कुठल्याही स्थितीत कायदा मोडणा-यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा सेठ यांनी दिला.जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा सुरू असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाशी समन्वय ठेवण्याचे निर्देशही सेठ यांनी उपस्थित पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आणि पोलीस अधीक्षक चैतन्य एस. यांना दिले. यापूर्वीही वाळू तस्करांवर कारवाई केल्याचे पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली. जालना जिल्ह्यातील दहा पोलीस ठाण्याचे प्रस्ताव गेल्या कित्येक वर्षापासून धूळ खात पडून असल्याबद्दल त्यांना विचारले असता, ते म्हणाले की, लवकरच हे प्रस्ताव मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.आगामी सहा महिने महत्त्वाचे : सर्वांनी कायद्याचे पालन करावेआगामी सहा महिने हे पोलिसांसाठी ज्या प्रमाणे महत्त्वाचे आहेत, त्याच प्रमाणे ते जनतेसाठी देखील महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सणवार, निवडणुकांच्या काळात नागरिकांनी कायद्याचे पालन केल्यास कुठलेच प्रश्न निर्माण होणार नाहीत.परंतु या काळात जर कोणी मुद्दामहून कायद्याचे उल्लंघन करत असतील तर त्यांची गंभीर दखल पोलिसांकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे कायदा पाळून समाजातील शांतता अबाधित ठेवण्यावर पोलिसांचा भर राहील, असे सेठ यांनी यावेळी स्पष्ट केले.
दोषारोपपत्र दाखल करताना खबरदारी घ्या- रजनीश सेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:52 AM