जालना : जमिनीची फेरफार नोंद करण्यासाठी कन्नड तालुक्यातील भारंबा सजाच्या तलाठ्यासह कोतवालाला ३० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी पकडले आहे. ही कारवाई पिशोर येथे करण्यात आली. तलाठी दीपाली योगेश बागुल (३२, रा. पिशोर, ता. कन्नड), शेख हारून शेख छोटू (४१ रा. पिशोर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी संशयितांची नावे आहेत.
तक्रारदाराची भारंबा शिवारात वडिलोपार्जित जमीन आहे. तक्रारदार व इतर दोघा भावांच्या नावे फेरफार नोंद करण्यासाठी संशयितांनी ३० हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याची तक्रार जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिशोर येथे सापळा रचला. यावेळी तलाठी दीपाली बागुल व कोतवाल शेख हारून यांनी पंचासमक्ष ३० हजारांची लाच स्वीकारली. दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक एस. एस. शेख यांनी दिली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्यासह पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोकर, पोलिस अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, गणेश बुजाडे, गजानन कांबळे, प्रवीण खंदारे यांनी केली आहे.