प्लॉटचे फेरफार करण्यासाठी १७ हजारांची लाच स्वीकारतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात
By दिपक ढोले | Published: August 22, 2023 05:04 PM2023-08-22T17:04:44+5:302023-08-22T17:05:03+5:30
एसीबी पथकाने एका भोजनालयात सापळा रचून तलाठ्यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
जालना : प्लॉटचे फेरफार करून देण्यासाठी १७ हजारांची लाच घेताना इंदेवाडी येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले आहे. शिवाजी आनंदराव घुगे (५४, रा. माऊलीनगर, जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
तक्रारदार हे मयत भाऊजींचा प्लॉटिंगचा व्यवसाय सांभाळतात. इंदेवाडी येथील गट क्रमांक ५७ मधील १२ प्लॉट विक्री झालेले आहे. त्याची फेरफार करून देण्यासाठी शिवाजी घुगे याने यापूर्वी २५ हजार रुपये स्वीकारले होते. पैसे देऊनसुद्धा घुगे याने फेरफार करून दिले नाही. उलट मंडळ अधिकाऱ्याला प्रत्येक फेरसाठी पाच हजार रुपयांप्रमाणे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले.
तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. मंगळवारी पथकाने एका भोजनालयात सापळा रचून तलाठी घुगे याला १७ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्यासह गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश बुजडे यांनी केली आहे.