जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. गत पंचवार्षिकला ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात होती. भाजपचे ९ तर राष्ट्रवादीचे सात व एक शिवसेनेचा सदस्य होता. यंदा येथे राष्ट्रवादीविरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार असली तरी दोन्ही पॅनलकडून बंडोखोरांची वाढती संख्या पाहता तिसऱ्या आघाडीचे आव्हानदेखील उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय अनेकजण एकला चलो रे म्हणत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत. १७ जागांसाठी जवळपास १०० पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसून येत आहे.
घनसावंगी तालुक्यातील यावलप्रिंपी ही ग्रामपंचायत जिल्ह्यातील सर्वात लहान आहे. यात सात सदस्य असून, मागच्या पंचवार्षिकला भाजप विरुद्ध राष्ट्रवादी - सेना अशी लढत झाली होती.
यात भाजपचा एक तर राष्ट्रवादी-सेनेचे ६ सदस्य निवडून आले होते. यंदा मात्र यात बदल होणार आहे. यंदा येथील तरुण निवडणूक लढवणार आहेत.
त्यामुळे यंदा महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष अशी निवडणूक होणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.