महामार्ग पोलिसांकडून दहा हजार चालकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 12:50 AM2019-12-08T00:50:26+5:302019-12-08T00:51:21+5:30
महामार्ग पोलिसांनी चालू वर्षात १० हजार ९४८ वाहन चालकांवर कारवाई करून १५ लाख ७८ हजार रूपयांचा दंड आकारला आहे.
विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील महामार्ग पोलिसांनी चालू वर्षात १० हजार ९४८ वाहन चालकांवर कारवाई करून १५ लाख ७८ हजार रूपयांचा दंड आकारला आहे. महामार्ग विभागाच्या नव्या अध्यादेशानुसार आता राष्ट्रीय, राज्य महामार्गावर ठरवून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालविणाऱ्या चालकांवरही धडक कारवाई मोहीम हाती घेतली जाणार आहे.
जालना - औरंगाबाद, जालना- अंबड, जालना- देऊळगाव राजा, जालना- मंठा, जालना- सिंदखेडराजा, जालना- भोकरदन या राज्य व जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहने चालविताना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते. महामार्ग विभागाच्या वतीने याबाबत नव्याने अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून वाहने चालविताना कारसाठी प्रति तास ९० किमी., जीप व मालवाहतूक वाहनांसाठी प्रति तास ८० किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर दुचाकीसाठी प्रति तास ७० किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर राज्य महामार्गावर कारसाठी प्रति तास ७० किमी., जीप, दुचाकी व मालवाहतूक वाहनासाठी प्रति तास ६० किमीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहन चालक वेग मर्यादा ओलांडून वाहने चालवित असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
चालू वर्षात जिल्ह्यातील राज्य मार्गावर ७० प्राणांतिक अपघात झाले आहेत. यात ७९ जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर प्रवासी गंभीर जखमी झालेले ६६ अपघात आहेत. यात ९६ प्रवासी, चालक गंभीर जखमी झाले आहेत. असे एकूण १३६ अपघात झाले आहेत. वाहतूक नियमांचे विशेषत: वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आता वेगमर्यादा ओलांडणाºया वाहन चालकांविरूध्द कारवाईची धडक मोहीम हाती घेण्याचा निर्धार केला आहे.
ब्लॅक फिल्मची ४१ प्रकरणे
महामार्गा पोलिसांनी चालू वर्षात मर्यादेपेक्षा अधिकची ब्लॅक फिल्म बसविणा-या ४१ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तर ओव्हरस्पीड प्रकरणात केवळ चार चालकांवर कारवाई झाली आहे. मात्र महामार्ग विभागाच्या नवीन अध्यादेशानुसार व मिळालेल्या यंत्रणेचा वापर करून वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाणार आहे.