अंबड / रोहिलागड : चोरट्यांनी हायड्रोलिक पंपाचा वापर करून एका पेट्रोल पंपावरील तब्बल ४३४७ लिटर डिझेल चोरून नेले. ही घटना रविवारी रात्री अंबड तालुक्यातील किनगाव चौफुली येथील पेट्रोल पंपावर घडली. चोरट्यांनी एकूण ३ लाख ५४० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.अंबड तालुक्यातील किनगाव चौफुली येथे भीमराव निवृत्ती डोंगरे यांच्या मालकीचा सागर किसान सेवा केंद्र पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपावरील दोन कर्मचारी रविवारी रात्री काम झाल्यानंतर पंप बंद करून झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी पंपावरील सीसीटीव्ही कॅमेराची दिशा वळवून डिझेल टाकीचे झाकण काढले. त्या टाकीत हायड्रोलिक पंपाच्या साह्याने तब्बल ३ लाख ५४० रूपये किंमतीचे ४३४७ लिटर डिझेलची चोरी केली.डिझेल चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने पंप मालकाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी पांडुरंग डोंगरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तपास पोनि अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार व्ही. एस. चव्हाण हे करीत आहेत.
पंपातील चार हजार लिटर डिझेलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:47 AM