महिलेची पिशवी चोरणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:34 AM2019-11-29T00:34:48+5:302019-11-29T00:35:06+5:30
महिलेची दागिन्याची पिशवी चोरणाऱ्या चोरट्यास एडीएसच्या (दरोडा प्रतिबंधक) पथकाने जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महिलेची दागिन्याची पिशवी चोरणाऱ्याचोरट्यास एडीएसच्या (दरोडा प्रतिबंधक) पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून १५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी दुपारी जालना शहरातील रेल्वे स्टेशन भागात करण्यात आली.
जालना शहरातील मुख्य बाजारपेठेत आठ दिवसांपूर्वी एका महिलेची दागिने, रोख रक्कम असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेली होती. ही पिशवी चोरणारा सोनाजी मधुकर क्षीरसागर (रा.जामखेड ता.अंबड ह. मु. रेल्वे स्टेशन जालना) हा गुरूवारी दुपारी जालना शहरातील रेल्वे स्टेशन भागात येणार असल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती.
या माहितीवरून पथकाने कारवाई करून क्षीरसागर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने आठ दिवसांपूर्वी जालना शहरातील बाजारपेठेतून एका महिलेची पर्स लंपास केल्याची कबुली दिली. चोरीस गेलेल्या मुद्देमालातील सोन्याची अंगठी, एक नथ असा १५ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, सपोउपनि एम.बी.स्कॉट, पोहेकॉ रामप्रसाद रेंगे, संदीप चिंचोले, राजू पवार यांच्या पथकाने केली. दरम्यान, संबंधितांकडे इतर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.