लोकमत न्य्ाूज नेटवर्कशहागड : बसमध्ये चढणाऱ्या महिलेकडे असलेली दीड तोळे सोने, रोख रकमेची पर्स चोरट्यांनी लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी शहागड बसस्थानकात घडली. आठवड्यात बसस्थानकातील चोरीची ही दुसरी घटना असून, या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.शहागड येथील बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र पैठण येथे दर्शनासाठी जाणा-या - येणा-या भाविकांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांची लूट करीत आहेत. शहागड बसस्थानक समोरून साडेपाच तोळ्याच्या दागिन्यांची पर्स लंपास केल्याची घटना आठवड्यापूर्वी घडली होती. त्यातच रविवारी एका महिलेची पर्स लंपास करण्यात आली आहे. एक विवाहित महिला अंकुशनगर (ता.अंबड) येथे माहेरी आली होती. रविवार सकाळी पैठण ला जाण्यासाठी ती शहागड बसस्थानकात आली. पैठण बसमध्ये ती महिला चढत असताना चोरट्यांनी तिची पर्स लंपास केली. पर्समध्ये दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम होती. पर्स चोरी झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने परिसरात पाहणी केली. मात्र, हाती काही लागले नाही. महिलेच्या तक्रारीवरून पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सतत होणा-या चो-या पाहता पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.शहागड बसस्थानकात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढतच असल्याने महिलांना असुरक्षित वाटू लागले आहे. एका चोरीचा तपास गुलदस्त्यातच असताना दुसरी चोरी होत आहे.त्यामुळे शहागड बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
महिला प्रवाशाची पर्स चोरट्यांनी केली लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 1:01 AM