खळबळ : वाटूरमध्ये चोरट्यांचा धुडगूस, महिला, पुरूषांना मारहाण
By विजय मुंडे | Published: January 10, 2024 07:48 PM2024-01-10T19:48:18+5:302024-01-10T19:48:38+5:30
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
विजय मुंडे
वाटूर : येथील दोन घरात घुसलेल्या चोरट्यांनी महिला, पुरूषांना जबर मारहाण करीत रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साडेतीन लाख लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणात परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाटूर येथील उत्तम रामकिसन दहातोंडे यांच्या घरात बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला. कुटुंबातील सदस्य झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावली. आणि ४६ हजार रूपये रोख व २० हजारांचे दागिने चोरून नेले.
यावेळी जागे झालेल्या उत्तम दहातोंडे व त्यांच्या पत्नीला मारहाण करून चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरट्यांनी दहाताेंडे यांच्या घराशेजारी राहणारे पांडुरंग आसाराम सातपुते यांच्या घरात प्रवेश केला. पुरुष झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावून महिलांच्या खोलीमध्ये प्रवेश केला. महिलांना लोखंडी रॉड, काठीने मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या मारहाणीत आशामती पांडुरंग सातपुते, सुनीता विनायक काळे, सुरेखा गोरे या जखमी झाल्या. जखमी महिलांना जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वाटूर चौकीतील पोलिस कर्मचारी खंदारे, जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डीवायएसपी सुरेश बुधवंत, परतूर पोलीस ठाण्याचे पोनि. मच्छिंद्र सुरवसे, सपोनि. सचिन पुंडगे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या प्रकरणात परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
चौकट
श्वान परिसरात घुटमळले
घटनास्थळावर श्वान पथकास पाचरण करण्यात आले होते. परंतु, श्वान परिसरातच घुटमळले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. घटनेचा तपास लावण्यासाठी पथके नियुक्त केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.