लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरफोडी, वाहन चोरी प्रकरणातील तीन आरोपींना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी सकाळी शहरातील आझाद मैदान येथे करण्यात आली. अटकेतील दोघांकडून ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शाहरुख खान सत्तार खान, राहुल सुधाकर गाडेकर, गणेश शंकर शिंदे (तिघे रा. जालना) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. घरफोडी, वाहन चोरीतील तीन आरोपी शहरातील आझाद मैदान येथे बसले असल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पोनि. यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने बुधवारी सकाळी आझाद मैदानावर कारवाई केली. पथक पाहताच दुचाकीवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले.ताब्यातील तिघांकडे चौकशी केल्यानंतर जुना मोंढा परिसरातील जय भारत ट्रेडर्स नावाचे दुकान सहा महिन्यापूर्वी फोडल्याची त्यांनी कबुली दिली. देवेंद्र झंवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींकडून इतर गुन्हे उघड येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोनि यशवंत जाधव, पोहेकॉ ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण यांनी केली.दुकाने फोडली; दुचाकीही पळविलीदहा-बारा दिवसांपूर्वी संभाजीनगर येथून चेतन भाकडिया यांची दुचाकी (क्र.एम.एच.२१- डब्ल्यू.१५- १००५ ही चोरून नेल्याचे सांगितले. तसेच १० जून रोजी रात्री अमित दागडिया यांच्या मालकीचे खरपुडी फाटा येथील दुकान फोडून आतील मालाची चोरी केल्याचे, नवीन मोंढा येथील देशी दारूच्या दुकानाचे कुलूप तोडून आतील १५ देशी दारूच्या बाटल्या, गरीबशहा बाजार येथील एका हॉटेलातील एलईडी टीव्ही चोरून नेल्याची कबुली दिली.
घरफोडी करणारे तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 1:06 AM