वीज पडल्याने तिघांचा मृत्यू; एका मुलासह वृद्ध महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 05:38 PM2019-10-06T17:38:25+5:302019-10-06T17:38:28+5:30
झाडावर वीज पडल्याने दोन महिलांसह एका युवकाचा मृत्यू झाला.
सेवली (जालना) : झाडावर वीज पडल्याने दोन महिलांसह एका युवकाचा मृत्यू झाला. तर एका पाच वर्षीय मुलासह वृद्ध महिला जखमी झाली. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जालना तालुक्यातील सावरगाव भागडे शिवारात घडली.
जालना तालुक्यातील सावरगाव भागडे येथील गयाबाई गजानन नाईकनवरे यांच्या शेतात रविवारी सकाळी सोयाबीनची कापणी सुरू होती. सोयाबीन कापणीसाठी सावरगाव भागडेसह सेवली येथील मजूर कामाला आले होते.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. पाऊस येत असल्याने गयाबाई नाईकनवरे व इतर पाच ते सहाजण जवळच असलेल्या झाडाखाली जाऊन बसले. तर इतर मजुरांनी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये धाव घेतली. मात्र त्यावेळी अचानक झाडावर वीज कोसळली. या घटनेत गयाबाई गजानन नाईकनवरे (३८ रा. सावरगाव भागडे), मंदाबाई नागोराव चाफले (४३), संदीप शंकर पवार (३५ दोघे रा. सेवली) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
तर मंगेश संदीप पवार (०५) सुमनबाई साहेबराव नाईकनवरे (६५) हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमींना उपचारासाठी सेवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सुमानबाई नाईकनवरे यांच्यावर प्रथमोपचार करून सोडण्यात आले. तर मंगेश पवार याला पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सेवली पोलीस ठाण्याचे पोनि विलास मोरे, पोहेकॉ. राठोड, नागरगोजे, खुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
सिंदखेडराजा शिवारात दोघे जखमी
जालना तालुक्यातील सोनेगाव येथील आबाजी सखाराम पालवे यांचे शेत सिंदखेडराज शिवारात आहे. रविवारी दुपारच्या सुमारास अचानक वीज पडल्याने शेतात काम करणाऱ्या मंगल बद्रिनाथ पालवे (२४ वर्ष), शेख शब्बु शेख गुलाब (३० दोघे रा.सोनदेव. ता.जि.जालना.) हे दोघे जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत.