तीन लाख नागरिकांची तहान टँकरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:27 AM2019-02-10T00:27:22+5:302019-02-10T00:27:34+5:30
जिल्ह्यातील १४५ गावे आणि ८ वाड्या -वस्त्यांवरील २ लाख ९३ हजार २६८ नागरिकांची तहान १७१ टँकरद्वारे भागविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील १४५ गावे आणि ८ वाड्या -वस्त्यांवरील २ लाख ९३ हजार २६८ नागरिकांची तहान १७१ टँकरद्वारे भागविली जात आहे. टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत असून पाण्याबरोबरच पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला. त्याचाच परिणाम म्हणून भूजलस्तरही त्याच गतीने खालावत आहे. त्यामुळे अखेर फेब्रुवारी महिन्यातच जिल्हाभरातील १४५ गावे व ८ वाड्यांना १७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाळ्यातील चार महिन्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४० ते ४५ टक्के एवढे अत्यल्प पर्जन्यमान झाले. जिल्हाभरातील बहुतांश मोठे, मध्यम आणि लघु पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. तसेच भूजलस्तरही अपेक्षित प्रमाणात उंचावला नाही. दरम्यान, दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यानुसार आता भूजलस्तरही खालावू लागला आहे.
दुष्काळ किंवा टंचाई जणू जिल्ह्याच्या पाचवीलाच पूजलेली असावी, असे चित्र आहे. गावोगावी खासगी पाण्याच्या टँकरची चलती आहे. शुद्ध पाणी मिळत नाही म्हणून नागरिक पाणी विकत घेतात. काही गावांतील पाणीपुरवठ्याच्या योजना ३० ते ३५ वर्षे जुन्या झाल्या आहेत. दुरुस्ती किंवा नव्या योजनांची कामे वेळेत सुरू होत नाहीत. पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार पाणीटंचाईचे एक कारण मानले जाते.
जिल्ह्यातील दोन लाख ९३ हजार २६४ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जलयुक्त शिवार योजनेतील कामे झाल्याचे अधिकारी कागदोपत्रीच दाखवत आहेत. पण, त्या योजनांमध्ये पाणीच साठत नसल्यामुळे तेथील गावांमध्येही जिल्हा प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले आहेत. पाझर तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे नागरिकांसाठी आणि पशुधनासाठी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
भोकरदन तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकर भरण्यासाठीही पाणी नसल्यामुळे टँकर चालकांना वीस ते तीस किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. भोकरदन तालुक्यातील ४१ गावे आणि ५ वाड्या-वस्त्यांवरील १ लाख ०५ हजार ४७६ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टँकर भोकरदन तालुक्यात आहेत.
दरम्यान, पाणीटंचाई बरोबरच जिल्ह्यात चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जनावरांना चारा व पाण्यासाठी आतापासूनच भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्या सुरु करण्याची मागणी शेतकरी गणेश पोळ, अमोल माने, सर्जेराव काळे, कृष्णा वायाळ आदींनी केली आहे.
भूजल पातळी झपाट्याने खोल जाऊ लागली आहे. परिणामी जलस्त्रोतही झपाट्याने दम तोडू लागले आहेत. परिणामी टँकरसह अधिग्रहणांची मागणी वाढू लागली आहे. काही गावांत तर टँकर भरण्यासाठीही स्त्रोतांना पाणी नाही. अन्य गावांच्या शिवारातून पाणी आणण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
मंठा, परतूर, घनसावंगी, अंबड या तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती असतानाही कमी प्रमाणात टँकर सुरु आहे. या तालुक्यातील एकाही गावामधून पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी झालेली नाही. फेब्रुवारी महिना संपत आला असला, तरी टँकरची मागणी झालेली नाही.