तीन तलाठ्यांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:16 AM2019-01-25T00:16:42+5:302019-01-25T00:17:08+5:30
अंबड तालुक्यातील गोंदी जवळील हसनापूर येथे गुरूवारी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या तीन तलाठ्यांच्या अंगावर अवैध वाळूची वाहतूक करणा-या चालकाने ट्रॅक्टर अंगावर घातल्याने तलाठी कृष्णा मुजगुले हे जखमी झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी जवळील हसनापूर येथे गुरूवारी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या तीन तलाठ्यांच्या अंगावर अवैध वाळूची वाहतूक करणा-या चालकाने ट्रॅक्टर अंगावर घातल्याने तलाठी कृष्णा मुजगुले हे जखमी झाले आहेत. तर अन्य दोघांनी ट्रॅक्टर अंगावर येत असल्याचे दिसतात इतरत्र उडी घेऊन जीव वाचवला.
गेल्या काही महिन्यांपासून अवैध वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक करणा-या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असे असताना महसूल विभागाकडून या वाळू चोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अंबडचे तहसीलदार किशोर देशमुख यांच्या सूचनेवरून गुरूवारी दुपारी तीन वाजता तलाठी कृष्ण मुजगूले, अमोल कोंकटवार, आर. आर. कुंडगिर हे गोदापात्रात गेले होते. यावेळी ट्रॅक्टरचालक गोलू तिवारी यांनी या तिघांच्या अंगावर ट्रॅक्टर घातले. तसेच खाली उतरून तलाठ्यांसोबत वाद घालून धक्काबुक्की करून धमकी दिल्याची तक्रार किशोर मुजगूले यांनी दिली आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूध्द सरकारी कामात अडथळा करण्यासह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.