पाच लाखांच्या गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:07 AM2020-01-13T01:07:36+5:302020-01-13T01:07:44+5:30
शहरातील कुरेशी मोहल्ला, युसूफ कॉलनी, दु:खीनगर भागात पोलिसांनी कारवाई करून ४ लाख ८९ हजार २०० रुपयांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील कुरेशी मोहल्ला, युसूफ कॉलनी, दु:खीनगर भागात पोलिसांनी कारवाई करून ४ लाख ८९ हजार २०० रुपयांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली असून, याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस अधीक्षक निलेश तांबे व त्यांचे सहकारी शनिवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी शेख बद्रोद्दीन शेख बशीरोद्दीन (रा. कुरेशी मोहल्ला जुना जालना), शेख जावेद शेख रहीम (रा. दु:खीनगर जालना), इलियास मोहम्मंद जमालोद्दीन अन्सारी (रा. युसूफ कॉलनी जालना) यांच्या घरी प्रतिबंधीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असल्याची माहिती तांबे यांना मिळाली होती. या माहितीवरून शनिवारी रात्री या पथकाने तिन्ही ठिकाणी धाडी मारल्या. यावेळी शेख बद्रोद्दीन शेख बशीरोद्दीन यांच्याकडे २ लाख ३५ हजार ९५० रूपयांचा, शेख जावेद शेख रहीम यांच्याकडे १ लाख ४३ हजार ५०० रूपयांचा तर इलियास मोहम्मद जमालोद्दीन अन्सारी यांच्याकडे १ लाख ९ हजार ७५० रूपये असा एकूण ४ लाख ८९ हजार २०० रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी गुटख्याचा पंचनामा केला. या प्रकरणी वरील तिघाविरूध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोकॉ भागवत गवळी, पोकॉ प्रदीप पवार, पोकॉ स्वप्नील साठेवाड, पोकॉ योगेश पाठाडे आदींच्या पथकाने केली.