जालना शहरातील सिमेंटचे रस्ते व्हावेत म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना पालिकेस चाळीस कोटी रूपयांचा निधी हा वैशिष्ट्यपूर्ण निधीतून दिला होता. त्याच धर्तीवर लोखंडी पूल उभारणीसाठी देखील याच योजनेतून दानवे यांनी पुढाकार घेऊन १२ कोटी रूपये दिले आहेत. गेल्या मार्च मध्ये या पुलाच्या उभारणी कामाचा शुभारंभ झाला होता. आता एक वर्ष होत असून, हा पूल जवळपास पूर्ण होत आहे.
या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूल १५ मीटर रूंद करण्यात आला असून, उंची जुन्या पुलाएवढी कायम ठेवली आहे. हा पूल ८० मीटर लांब राहणार आहे. पुलासाठी आरसीसी आर्च हे तंत्र वापरून तो तयार करण्यात येत असल्याचे नागरे यांनी सांगितले. या पुलावरून लवकरच वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. हा निधी जरी केंद्रीय मंत्री दानवेंनी दिला असला तरी यासाठी आ. कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांनी देखील प्रयत्न केले होते.
चौकट
लहान पूलही नवीन होणार
कुंडलिका नदीवर लोखंडी पुला शेजारी नवीन लहान पूल बांधण्यात आला होता. हा लहान पूलही नवीन पूल सुरू झाल्यावर पाडून याच धर्तीवर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही पुलांना मिळून हा १२ कोटी रूपयांचा निधी मिळाला असल्याचे नागरे यांनी नमूद केले. नवीन पुलामध्ये आठ स्पॅन घेण्यात आले आहेत.