विद्युत धक्क्याने ट्रकचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:27 AM2021-03-14T04:27:21+5:302021-03-14T04:27:21+5:30
खळबळ : पायातील चपलांमुळे वाचले क्लिनरचे प्राण मठपिंपळगाव : ट्रकमधील पॉवर स्टेशनच्या लोखंडी साहित्याला महामार्गावरून गेलेल्या मुख्य विद्युत वाहिनीची ...
खळबळ : पायातील चपलांमुळे वाचले क्लिनरचे प्राण
मठपिंपळगाव : ट्रकमधील पॉवर स्टेशनच्या लोखंडी साहित्याला महामार्गावरून गेलेल्या मुख्य विद्युत वाहिनीची तार अडकल्याने विद्युत धक्का लागून चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी क्लिनरने पायात चपला घालून गाडीतून खाली उडी मारल्याने तो बचावला. ही थरारक घटना शनिवारी सकाळी ११ च्यासुमारास जालना-अंबड मार्गावरील आंतरवाला (ता. जालना) शिवारात घडली.
मनोहर निकाळजे (वय ५०, रा. औरंगाबाद) असे मृत चालकाचे नाव आहे. जालनामार्गे एक ट्रक शनिवारी सकाळी महावितरणचे साहित्य घेऊन जात होता. हा ट्रक आंतरवाला मार्गावर आला असता, ट्रकमधील (एमएच ०४- ई.बी. ९६३७) पॉवर स्टेशनचे साहित्य महामार्गावरून गेलेल्या मुख्य वीज वाहिनीच्या तारेला अडकल्याने विद्युत तार तुटली. त्यावेळी ट्रकच्या खाली उतरलेल्या चालकाला जोराचा विद्युत धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर क्लिनर मोह सिराज याने पायात चपला घालून खाली उडी मारल्याने तो बचावला. या घटनेने महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच
महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा खंडित केला. यावेळी महामार्ग विभागाचे पोलीस व जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचारी सूर्यकांत चाटे, अशोक येडके, आनंद कनाटे यांनी वाहतूक सुरळीत केली. अन् बस प्रवासी बचावले.
या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी एक भरधाव बस अंबडहून जालन्याच्या दिशेने जात होती. पोलिसांनी प्रसंगावधान राखून बसला थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.