आगीत जालना शहरातील दोन गॅरेज खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:50 AM2018-03-26T00:50:57+5:302018-03-26T00:50:57+5:30
औरंगाबाद चौफुली परिसरात सकाळी दहाच्या सुमारास दोन गॅरेजला अचानक आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील औरंगाबाद चौफुली परिसरात सकाळी दहाच्या सुमारास दोन गॅरेजला अचानक आग लागली. यामध्ये दुरुस्तीला आलेल्या दोन कारसह अन्य साहित्य जळाल्याने सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.
औरंगाबाद चौफुली परिसरात मोती तलावाकडील बाजूने डी मोटार गॅरेज व बालाजी अॅटो गॅरेज आहे. पत्र्याचे शेड टाकून तयार केलेल्या डी मोटार गॅरेजमधून धूर येत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. स्थानिकांनी गॅरेज चालक रवी जमदाडे यांना माहिती दिली. जमदाडे यांनी अग्निशमन विभागाला याबाबत कळविले. गॅरेजमधील आॅईल, टायरर्स पेटल्यामुळे आग भडकली. त्यामुळे दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आलेल्या दोन कार, टायर व अन्य एका कारचे इंजिन जळाल्याने सव्वा तीन लाखांचे नुकसान झाले.
डी गॅरेजच्या मागील बाजूस असलेल्या बालाजी अॅटो गॅरेजलाही आग लागली. बालाजी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली एक दुचाकी व अन्य साहित्य जळाल्याने सुमारे सत्तर हजारांचे नुकसान झाले. दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला.
अग्निशमन अधिकारी डी. एम. जाधव, सागर गडकरी, विठ्ठल कांबळे, संदीप दराडे, नितेश ढाकणे, संतोष काळे, अशोक वाघमारे यांनी पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीवर लवकर नियंत्रण मिळविल्यामुळे आजूबाजूच्या दुकानांचे नुकसान टळल्याचे जाधव यांनी सांगितले. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती.