जालन्यात कामगारांना मारहाण करून लुटमार करणारे दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:28 PM2019-01-14T17:28:46+5:302019-01-14T17:29:15+5:30
त्यांच्याकडून रोख रक्कमेसह ६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जालना : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कामगांराना मारहाण करुन लुटमार करणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी २४ तासात ताब्यात घेतले. उमेश कुटे, आकाश कांळुके (दोघे. रा. नुतनवसाहत) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह ६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रोशनकुमार सुरेश यादव यांनी ११ जानेवारी रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, मी व माझा मित्र जयकांतकुमार मंडल औद्योगिक वसाहतीतून जात असतांना त्यांना दोन इसमांनी मारहाण करुन रोख रक्कम बळजबरीने काढुन नेली. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्हाचा तपास करत असतांना उमेश कुटे हा गुन्हा घडलेच्या दिवशी एमआयडीसी भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन त्याला जुना जालना भागातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला विचारपूस केली असता, त्यांने मित्र आकाश कांळुके सोबत हा गुन्हा केल्याची कबूली दिली. पोलिसांनी सतकर कॉम्पलेक्स समोरुन आकाशला ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून रोख रक्कम, तीन मोबाईल, एक दुचाकी असा ६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे, पोनि. बाळासाहेब पवार, कर्मचारी राम शिंदे, नंदु ठाकूर, अनिल काळे, कृष्णा भडांगे, भरत कडूळे, नंदकुमार दांडगे यांनी केली.