जालन्याच्या औद्योगिक वसाहतीला उद्योगांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:13 AM2018-09-20T00:13:01+5:302018-09-20T00:13:19+5:30
जालन्यात जवळपास साडेतीनशे हेक्टरवर औद्योगिक वसाहतींचा तिसरा टप्पा उभारण्यात आला आहे. सध्या या भागात केवळ तीन उद्योजकांनी त्यांचे कारखाने सुरू केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबई, पुणे परिसरात उद्योग उभारणीला आता जागा शिल्लक नसल्याने अनेकांनी औरंगाबाद, जालना येथे उद्योग उभारणीला प्राधान्य दिले होते. मात्र आज नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जालन्यात जवळपास साडेतीनशे हेक्टरवर औद्योगिक वसाहतींचा तिसरा टप्पा उभारण्यात आला आहे. या परिसरात २२० केव्हीचे वीज उपकेंद्र तसेच जलवाहीनी आणि रस्ते तसेच पथदिवे बसविले आहेत. तसेच या भागातील भूखंडाचे वितरण हे यापूर्वीच लिलाव पध्दतीने झाले आहे. असे असताना अनेकांनी येथे उद्योग उभारणीसाठी भूखंड खरेदी केले आहेत, मात्र प्रत्यक्षात उद्योग उभारणीसाठी अद्याप गुंतवणूक करण्यास कोणी पुढे येत नसल्याचे वास्तव आहे. सध्या या भागात केवळ तीन उद्योजकांनी त्यांचे कारखाने सुरू केले आहेत.
जालना येथे या औद्योगिक विकासाच्या तिसऱ्याटप्प्यामुळे पूर्वीच्या दोन टप्प्यातील उद्योगांनी त्यांचा विस्तार करण्यासाठी येथे भूखंड घेतले आहेत. परंतु सध्या मंदीचे वातावरण असल्याने येथे स्थानिक उद्योजक गुंतवणुकीचे धाडस करत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मुंबई, पुणे येथील उद्योजकांनी देखील येथे येणे टाळले असून, त्यांचा भर हा औरंगाबाद येथील दिल्ली ते मुंबई कॉरिडोरमध्ये जागा मिळावी हा हेतू असल्याने जालन्यात एकही मोठा उद्योग गेल्या पाच वर्षात आलेले नाही.
जालना शहरातील औद्योगिक वसहातीत दोन आणि जालना तालुक्यातीलच रामनगर येथे आणखी एक ७० कोटी रूपयांचे २२० केव्हीचे उपकेंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे जालन्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. या केंद्रामुळे उद्योगांना हवा तेवढा वीजपुरवठा मिळू शकतोे. तसेच या केंद्रातून आता काही स्टील उद्योजकांनी त्यांच्या कंपनीजवळ १३२ केव्हीचे उपकेंद्र उभारली असून, थेट २२० केंद्रातून येथे वीज वाहून नेली जात आहे. मध्यंतरी जालन्यातील २२० उपकेंद्र थेट अकोला जिल्ह्यातील खापरखेडा येथील वीज निर्मिती केंद्राशी जोडण्याचा प्रस्ताव होता.