ऐन गणेशोत्सवात पाण्याचे विघ्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:54 AM2018-09-13T00:54:44+5:302018-09-13T00:55:02+5:30
ऐन सणासुदीच्या दिवसात वीज वितरण कंपनीने वीज बिल थकल्याचे कारण देत शहरातील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ऐन सणासुदीच्या दिवसात वीज वितरण कंपनीने वीज बिल थकल्याचे कारण देत शहरातील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सणासुदीच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
नवीन जालन्यासाठी घाणेवाडी तलाव तर जुना जालन्यासाठी जायकवाडी योजनेच्या स्त्रोत आहे. जायकवाडीचे पाणी मस्तगड येथील पंपहाऊसमधून जुना जालन्यात वितरित होेते. तर घाणेवाडी तलावातून शहरात येणाऱ्या पाण्यासाठी विजेची गरज लागत नाही. परंतु फिल्टरबेडमध्ये पंपाना वीजपुरवठा केला जातो. महावितरण कंपनीकडून वीजबिल थकल्याने अनेकवेळा पाणी पुरवठ्याची वीज तोडली आहे. तर शहरातील काही भाग वगळता विद्युत खांबाचा वीज पुरवठा अनेक वर्षापासून बंदच आहे. विशेष म्हणजे शहरात पाण्याची मुबलक उपलब्धता असताना वीजपुरवठा खंडित केल्याने आठवडाभरापासून दिवपसापासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प आहे. शहरातील हातपंपही नादुरुस्त असून पावसाचे पाणी न पडल्याने ते स्त्रोतही लोप पावत चालले आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठा शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना काही प्रमाणात सूट देण्यात येते, मात्र वीज वितरण कंपनी सणासुदीच्या तोंडावर नगरपालिकेची अडवणूक करत असल्याचा आरोप पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र नगरपालिका आणि महावितरणच्या कलगीतु-यात नाहक सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकात संताप आहे. यावर तातडीने तोडगा काढून शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच अंतर्गत जलवाहिनीला जागोजागी गळती लागत असल्याने काही वार्डात दहा दिवसापासून पाणीपुवरवठा झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील अंतर्गत जलवाहिनी अनेक वर्षापासून बदलण्यात आली नाही. जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने पाण्याची नासाडी होत आहे परिणामी शहरातील बहुतांश वार्डात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी आहेत. गळतीमुळे पिण्यायोग्य लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे न.प. ने लक्ष देण्याची गरज आहे.