लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : १८ हजार लोकसंख्येच्या टेंभुर्णी गावाला मागील पाच महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात नळाला पाणी येण्यासाठी महिना- दीड महिना लागत असल्याने आता १८ हजार टेंभुर्णीकरांना केवळ ‘जार’ च्या पाण्याचा आधार उरला आहे. वापरायला टँकर आणि प्यायला जार... अन् पाणीटंचाईने ग्रामस्थ झाले बेजार असे म्हणण्याची वेळ सध्या गावकऱ्यांवर आली आहे.टेंभुर्णीचा पाणीप्रश्न या ना त्या कारणाने नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. टेंभुर्णीला पाणीपुरवठा करणा-या अकोला देव येथील जीवरेखा धरणात सध्या पाणीसाठा उपलब्ध असतानाही लोडशेडिंग, पाईपलाईन गळती, जनरेटर इंधनखर्च असमर्थता, टॅकर नामंजूर अशा अनेक कारणामुळे टेंभुर्णीकर सदैव तहानलेलेच राहिले आहे.गावातील प्रत्येक झोनला नळाचे पाणी एकदा येण्यासाठी ग्रामस्थांना जवळपास दिड महिना वाट पाहावी लागत आहे.अशा भीषण अवस्थेत ५ रूपयात २० लीटर पाणी देणारे ग्रामपंचायतचे फिल्टर प्लँट सध्या बंद पडल्याने संपूर्ण गावाची दारोमदार तीन खाजगी फिल्टर प्लंटवरच आहे. या ३ प्लंटवर मिळून दररोज जवळपास १८ हजार लीटर पाण्याची विक्री होत आहे. एरवी १० रूपयात भरून मिळणारे हे जार आता जागेवर १५ रूपयाला भरून मिळत आहे.याशिवाय वापरण्यासाठी ट्रँकरच्या पाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ट्रँकरलाही जवळ पाणीसाठा नसल्याने ट्रँकरचे भाव ही ६०० ते ७०० च्या घरात जावून पोहचले आहे. सामान्य जनतेने ऐन दुष्काळात पाण्यासाठी एवढी रक्कम आणावी कुठून असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामस्थांची ‘जार’च्या पाण्यावर मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:40 AM